SCM सोलापूर जिल्हा विधानसभा निवडणूक विशेष बुलेटीन

या आठवड्यात शिंदे व भालकेंचा विधानसभेचा निर्णय
पंढरपूर – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या आठवड्यात लागणार हे निश्‍चित असून याच दरम्यान माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके आपला लढण्याचासाठीचा पक्ष निश्‍चित  करणार असे चित्र आहे. सध्या दोघांची ही मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. शिंदे याचा गावभेट दौरा सुरू असून त्यांचे समर्थक त्यांना आपण कोणत्याही पक्षात जावा आम्ही तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत आहेत. शिंदे यांना भाजपात जाण्याची इच्छा असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. पण शिवसेना भाजपा युतीची अद्याप घोषणा झालेली नाही व जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने ते ताक फुंकून ही पित आहेत. माढ्याची जागा शिवसेनेकडे आहे. अशीच अवस्था भारत भालके यांची आहे. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेकडे आहे. भालके यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध जुळले आहेत तर गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भालकेंना भाजपात आणण्यासाठी इच्छुक आहेत. भालके यांनी आता समर्थकांचा मेळावा 11 सप्टेंबर रोजी मंगळवेढ्यात बोलाविला आहे. सध्या ते आपल्या कार्यकर्त्यांशी तसेच पदाधिकार्‍यांची सतत चर्चा करत आहेत. भालके यांनी आघाडीत रहावे यासाठी दोन्ही काँगे्रसकडून सतत मनधरणी ही होत असल्याचे सांगितले.

मनसेचा पंढरपूर-मंगळवेढ्यावर दावा, तयारी ही सुरू

पंढरपूर – दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी होण्याची शक्यता लक्षात घेता जागा वाटपात पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असून यासाठी मनसेच्या सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी येथून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या सर्वच नेते व आमदार हे भाजपा अथवा शिवसेनेच्या मागे असल्याने येथून आघाडीला सक्षम उमेदवाराची गरज लक्षात घेता व धोत्रे यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांनी येथून लढण्याची तयारी केली आहे. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने येथून उमेदवारी मिळण्याची त्यांना खात्री आहे. यासाठी त्यांची साखर पेरणी सुरू असून पूरग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रम असोत की युवकांचे मेळावे घेवून एमआयडीसी व  अन्य योजनांसाठी त्यांचे सुरू असणारे प्रयत्न तसेच मनसेच्यासहकार सेनेच्या माध्यमातून सुरू असणार्‍या कामामुळे त्यांना येथून आपण प्रस्थापितांना टक्कर देण्याची खात्री आहे. येथून परिचारक गट हा भाजपाच्या सोबत आहे तर भालके यांना ही भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत मोठ्या दोन सहकारातील गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना धोत्रे यांनी मतदारसंघात सतत दौरे करून आपले ही बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शंभरीकडे वाटचाल करणार्‍या आबांचा दौरा, पंतांचे नाव ही चर्चेत  
पंढरपूर – वयाची नव्वदी पार करून शंभरीकडे वाटचाल करणारे सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी 2019 साठी पुन्हा कंबर कसली असून मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये त्यांचा गावभेट दौरा सुरू आहे. एका दिवसात सात ते आठ गावांना ते भेटी देत आहेत. वय वाढले असले तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. यंदा त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी आपला या मतदारसंघातील उत्तराधिकारी निवडून आणण्याचा ही चंग बांधला आहे. राष्ट्रवादीने त्यांना या मतदारसंघात पाठिंबा मागितला मात्र त्यांनी यास नकार दिला असून ते शेकापचाच उमेदवार येथून विजयी करणार हे निश्‍चित आहे. सांगोल्यात दौरा झाल्यानंतर आता भाळवणी गटातील गावांमध्ये दोन दिवस ते भेटी देवून चाचपणी करत आहेत.
दुसरीकडे पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे देखील 2019 च्या विधानसभेचे पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार असतील अशी चर्चा आहे. येथे परिचारक गटासमोर आमदार भारत भालके यांच्यासारखे तगडे आव्हानं असून दोन वेळा भालके विजयी झाले व तिसर्‍यांदा त्यांनी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी पंतांना जर विधानसभा रणधुमाळीत उतरविले तर लढत सोपी होण्याची आशा अनेकांना असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. पंताचे वय ही आता 83 वर्षे आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!