अकलूजमध्ये चोरीला गेलेली मंगळसूत्र परत मिळवून देणाऱ्या पोलीस बांधवांचा फिर्यादी भगिनींकडून सत्कार
संतोष भोसले
अकलूज, दि. ३१ – चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांना पकडुन अकलूज पोलीसांनी जप्त केलेले सुमारे १ लाख रूपयांचे सोने (मंगळसूत्र) न्यायालयाच्या आदेशानुसार आज फिर्यादींना परत देण्यात आले. या कामगिरीबद्दल फिर्यादींकडून पोलिस बांधवांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी छाया महादेव नागणे व भाग्यश्री शैलेश क्षीरसागर (रा. अकलूज) यांचे सोने अज्ञात चोरट्यांची हिसकावून नेले होते. याबाबत त्यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्रीकांत निकम, सुहास क्षीरसागर, राहुल वाघ, शिवाजी पांढरे, विशाल घाटगे, यशवंत अनंतपुरे, संदेश रोकडे, प्रसाद सूर्यवंशी यांच्या पथकाने तपास करून, शहरात गस्त वाढवून व आपल्या गुप्त खबऱ्यांमार्फत शोध घेऊन अशा चोऱ्या करणारे आरोपी शंकर दादा सुळ व दुर्योधन कांतीलाल चोरमले दोघे (रा. गोंदी) यांना अटक केली.
आरोपींकडे चौकशी करून तपास केला असता त्यांनी सदर गुन्हे केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून न्यायालयात सादर केला. न्यायालयाने सदर मुद्देमाल ओळख पटवून फिर्यादींना परत करण्याची सूचना केल्यानंतर आज अकलूज पोलीस ठाण्यात छाया महादेव नागणे यांचे सुमारे दोन तोळे वजनाचे व भाग्यश्री शैलेश क्षीरसागर यांचे सुमारे दीड तोळा वजनाचे मंगळसुत्र त्यांना परत करण्यात आले. पोलिसांनी उत्कृष्टपणे तपास करून एका महिन्याच्या आत सोने शोधुन दिल्यामुळे फिर्यादींच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.