पंढरपूर- उस्मानाबाद, नांदेड व नाशिक सारख्या लांबच्या भागातील साखर कारखाने यशस्वीपणे चालविणारे व पंढरपूरमध्ये डिव्हीपीमध्ये उद्योग समुहाच्या माध्यमातून तरूणांच्या हाताला काम देणाऱ्या अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यात आपला जनसंपर्क चांगलाच वाढविला असून रविवारी त्यांनी नूतन ग्रामपंचायत सदस्यांसाठी ध्यास समृध्द गावाचा ,संवाद विकासग्रामाचा ही कार्यशाळा घेतली. ज्यास भास्करराव पेरे पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक होताच हा उपक्रम राबविल्याने याचा निश्चितच फायदा होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर आता गावाच्या विकासाकडे लक्ष दिले जावे व आदर्श गाव तयार व्हावीत यासाठी आदर्श सरपंच म्हणून देशभर लौकिक असणाऱ्या भास्करराव पेरे पाटील यांना येथे निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून गावाच्या विकासासाठीचे अनेक कानमंत्र दिले. तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायत असणाऱ्या जैनवाडीला अभिजित पाटील यांनी एक लाख रूपयांचे बक्षीस देवू केले. निवडणुकीपूर्वी त्यांनी जे गाव बिनविरोध होर्इल त्यांना एक लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती.
अभिजित पाटील यांनी पंढरपूर भागात डिव्हीपी उद्योग समुहाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय उभे केले आहेत. याच बरोबर त्यांची साखर कारखानदारीतील वाटचाल ही आश्वासक दिसत आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील कारखाने ते चालवत असून चांगला ऊसदर देत आहेत. कोरोनाकाळात त्यांनी पंढरपूर परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. अनेक संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांची त्यांची जवळीक आहे. साखर उद्योगासमोरील समस्यांबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार याच बरोबर केंद्रातील मातब्बर मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून साखर निर्यात धोरण तसेच साखर दराबाबत निवेदन दिली तसेच या विषयांवर चर्चा केली आहे.
पंढरपूर भागात गटतट व परिवारांचे राजकारण आहे. साखर कारखानदारीवरून विठ्ठल व पांडुरंग परिवार येथे कार्यरत आहेत. तालुक्याच्या राजकारणात परिचारक, भालके व काळे यांच्यासारखे जुने व मातब्बर गट काम करत आहेत. अशात अभिजित पाटील यांनी युवकांचे संघटन व यशस्वी उद्योग उभा करत आपले स्थान येथे निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे.
कार्यशाळेस मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके , शशिकांत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेतील ठळक मुद्दे
*ग्रामविकासासाठी सर्वांनी पुढे यावे. यापुढील काळात चांगले काम करणाऱ्या सरपंचांना बेस्ट सरपंच पुरस्काराने सन्मानीत करणार.- दिलीप स्वामी
*वृक्षारोपण करताना लोकसंख्येबरोबरच प्राण्यांचा ही विचार करा व तसेच नियोजन करून जास्तीत जास्त झाडे लावा. – भास्करराव पेरे पाटील
*ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न कसे मिळेल याचे नियोजन करा. – अभिजित पाटील