अवकाळी पावसामुळे पिकांना धोका, द्राक्ष-आंबा उत्पादक धास्तावले

पंढरपूर – मागील चोवीस तासात वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. याचा फटका शेतात उभ्या असणार्‍या ज्वारी, गहू या पिकांसह काढणीला आलेली द्राक्ष व मोहोर आलेल्या आंबा बागांना बसला आहे. अनेक ठिकाणी वार्‍यामुळे पपईच्या बागाही जमीनदोस्त झाल्या आहेत.

मागील दोन वर्षापासून शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा संकट सोसत आहे. मागील वर्षी 2020 ला ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टीत शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यातून बळीराजा बाहेर येतो ना येतो तोच आता पुन्हा फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील चोवीस तासात वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण सर्वत्र अहे. यातच गार वारे व हलका पाऊस कोसळत असल्याने आता रब्बी ज्वारी व गहू पीक संकटात आले आहे. ज्वारी काळी पडण्याची भीती आहे. याच बरोबर यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांना अगोदरच फटका बसला होता. आता द्राक्ष काढणीसाठी येत असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने पावसाचे पाणी घड्यातील मण्यात जावून ती तडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होते. द्राक्षघड खराब होतात.

आंब्याच्या झाडांना आता मोहोर आला असून यातच अचानक पाऊस व वारे आल्याने मोहोर गळून पडण्याचा शक्यता असते. यामुळे सध्या शेतकरी धास्तावले आहेत. बुधवारी रात्री तसेच गुरूवारी पहाटे व सकाळी अवकाळी पावसाने पंढरपूर भागात हजेरी लावली आहे. कासेगाव, लक्ष्मी टाकळी, सरकोली यासह विविध भागात पावसाची नोंद आहे. येथे अनेक शेतकर्‍यांचे या अवकाळीने नुकसान झाले आहे. या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!