आईने केला मुलीचा खून, अवघ्या सहा तासाच्या पोलीस तपासात फिर्यादीच बनली आरोपी

मंगळवेढा – शेत जमिनीत हिस्सा मागितल्याच्या कारणावरून आपल्या 35 वर्षीय मुलीचा खून डोक्यात दगड घालून आईनेच केल्याचा प्रकार उघड झाला असून संबंधित महिलेला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या सहा तासात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. पहाटे याच महिलेने आपल्या मुलीचा खून अज्ञात इसमाने केल्याची फिर्याद दिली होती मात्र काही तासाच्या पोलीस तपासानंतर फिर्यादीच आरोपी झाली.
या घटनेची माहिती अशी की , अकोला रस्त्यावर राहणाऱ्या चंदाबाई नरळे यांनी आपली मुलगी मंगल कुबेर नरळे (वय 35) हिचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी घराच्या गच्चीवर डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद आज पहाटे 4.00 वाजता मंगळवेढा पोलिसात दाखल केली होती. यात त्यांनी नमूद केले होते की, 9 जून रोजी रात्री आम्ही मायलेकी गच्चीत झोपलो होतो. रात्री आपण शौचास गेले असता अज्ञात व्यक्तीने मंगल हिचा खून केल्याचे म्हंटले होते.
अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली . फिर्यादी चंदाबाई नरळे हिच्याकडे सखोल चौकशी केली असता मयत मुलगी मंगल ही जमिनीचा हिस्सा मागत असल्याने तिचा खून आपणच केल्याचे त्यांनी कबुल केले.
पोलिसांनी चंदाबाई कुबेर नरळे (वय 55) या महिलेस खून प्रकरणी अटक केली आहे. घटनास्थळी पंचनामा झाला असून मुलीचा खून करण्यासाठी वापरलेला दगड जप्त करण्यात आला आहे. आरोपी चंदाबाई हिच्या पतीचे मागील सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे. तर मयत मुलगी मंगल ही मागील दहा महिन्यापासून आईकडेच रहात होती. या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, भगवान बुरसे हे करत आहेत.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!