एकादशीला सुनी पंढरी, यंदा भाविकांची  घरूच मानस आषाढीवारी

पंढरपूर, दि.1- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आषाढी एकादशी दिवशी घातले. दरम्यान यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रथमच भाविकांविना आषाढीचा सोहळा पंढरीत साजरा झाला. राज्यातील लाखो विठ्ठलभक्तांनी आपल्या घरी राहूनच हरीनामाचा गजर केला व मानसवारी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
यंदाची आषाढी राज्य व देशभरातील भाविकांनी आपआपल्या घरी बसूनच विठुनामाचा गजर करत साजरी केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी या वारीस येण्यास भक्तांना मनाई करण्यात आली आहे. केवळ शासकीय महापूजा येथे पार पडली तर पंरपरा जपण्यासाठी मानाच्या ज्या दहा पालख्या येथे आल्या आहेत त्यांचे चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा मोजक्या भाविकांसह फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पार पडल्या. प्रथमच आषाढीचा सोहळा हा संचारबंदीत साजरा झाला. पंढरीच्या नागरिकांनी देखील घरी बसूनच श्री विठ्ठलाची आराधना केली.
दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेला भक्तीचा महापूर येतो व लाखो भाविक जेथे स्नान करतात त्या वाळवंटात आज दिवसभर शुकशुकाट होता. केवळ मानाच्या पालख्यांबरोबरच मोजके वारकरी हे पादुकास्नानासाठी येथे सकाळी आले होते. काठावरील घाट हे बंद करण्यात आले आहेत. शहर व शहराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!