कल्याणराव भाजपात आणि मी वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात एकत्रच आहोत: आ.भालके

पंढरपूर – कल्याणराव काळे हे भारतीय जनता पक्षात आणि मी वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारातच आहोत हे सर्वांना माहित आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान काळेंसह काही सहकाऱ्यांना सुरक्षा कारणास्तव बाहेर थांबावे लागले होते. याबाबत मी स्वतः त्यांची दिलगिरीही व्यक्त केली आहे तसेच पुन्हा त्यांना फोन करून साहेबांना भेटण्याची विनंती केल्याचे पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचीयादी पोलीस विभागाने मागवून घेतली होती व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली नव्हती. मी स्वतः पवार साहेबांबरोबर असल्यामुळे आपले काही सहकारी पंढरपूरमधील निवासस्थानाच्या बाहेर राहिले होते. यात सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, दिनकरबापू पाटील, विजयसिंह देशमुख यांचा यात समावेश होता. याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. या सर्वांना पोलिसांनी सोडले नसल्यामुळे ते घराजवळून निघून गेल्याचे मला समजल्याबरोबर आपण पवार साहेबांसमोरच पुन्हा त्यांना फोन करून साहेबांना भेटण्यासाठी विनंतीही केली होती. त्यामुळे कोणी गैरसमज करून देऊ नये. आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही विठ्ठल परिवारात आहोत हे माहित असावे. असा खुलासा आमदार भालके यांनी केला आहे.
कै. सुधाकरपंत परिचारक, राजूबापू पाटील व रामदास महाराज जाधव यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या कुटुंबीयांची शरद पवार यांनी मागील आठवड्यात सांत्वनपर भेट घेतली होती. यासाठी ते पंढरपूर तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार भालके यांच्या निवासस्थानी ते गेले होते. पवार यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे नेते कल्याणराव काळे हे पवार भालके यांच्यानिवासस्थानी गेले होते. मात्र त्यांच्यासह काही जणांना आत प्रवेश दिला गेला नाही. दरम्यान हे नेते तेथून घरी निघून गेले होते. मात्र आमदार भारत भालके यांना हे समजल्यानंतर त्यांनी फोन करून त्यांना परत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बोलाविले होते. नंतर पवारसाहेबांबरोबर काळे यांची चर्चा ही झाल्याचे सांगण्यात आले.
कल्याणराव काळे हे सध्या भारतीय जनता पक्षात असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्‍वास दाखविला होता. काळे हे जरी पूर्वी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचे व शरद पवार यांचे संबंध चांगलेच होते. काळे यांच्या कार्यक्रमांसाठी पवार हे वाडीकुरोलीत देखील गेले होते. काळे व भालके दोघे ही विठ्ठल परिवरात एकत्र काम करत आहेत तर पवार यांनी आजवर नेहमीच या परिवाराला ताकद दिली आहे. आता साखर कारखान्यांचे अनेक प्रश्‍न असून राज्यात सत्ता महाविकास आघाडीची आहे तर शरद पवार हे याच सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा शब्द येथे अंतिम मानला जातो. यामुळे विठ्ठल परिवारातील साखर कारखान्यांना सहाजिकच पवार यांच्याकडून मदतीची अपेक्षा असणारच आहे. यासाठी साखर उद्योगातील मंडळी नेहमीच पवार यांचे मार्गदर्शन घेत असतात.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!