कोणत्या विचाराचे वारसदार आहात..कारखाने बंद पाडण्याच्या ? : आ.परिचारकांचा विरोधकांना सवाल

पंढरपूर- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील श्रीक्षेत्र माचणूर येथे फोडण्यात आला आणि यात अपेक्षेप्रमाणे विरोधी उमेदवाराच्या हाती असणार्‍या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विषयाला आमदार प्रशांत परिचारक यांनी हात घातला. यावेळी त्यांनी कडाडून टीका करताना विरोधकांना आपण कोणत्या विचाराचे वारसदार आहात.. कारखाने बंद पाडण्याच्या का? असा सवाल करत आम्ही विकासाचा मुद्दा घेवून जनतेसमोर आलो असल्याचे स्पष्ट केले.
ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होत असून एका बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे मतदारभेटीवर भर देत असून सतत लोकसंपर्कात आहेत तर दुसरीकडे आता भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे. माचणूर येथे बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधी उमेदवारावर टीका केली. ते म्हणाले, विठ्ठल कारखाना हा राज्यातील अग्रेसर साखर उद्योग होता. जिल्ह्यात सहकार महर्षी व नंतर विठ्ठल सहकारी हे कारखाने होते यानंतर भीमाची उभारणी झाली. 1990 मध्ये या कारखान्याच्या 50 कोटी रूपयांहून अधिकच्या ठेवी होती व यापैशातून कारखान्याचे विस्तारीकरण झाले होते. आज मात्र कोट्यवधीच्या कर्जात हा साखर उद्योग आहे. कर्मचार्‍यांना पगार मिळत नाहीत. कुटुंंबातील लोकांना कामाला जावे लागत आहे. आपण कालच या कारखान्याच्या काही कर्मचार्‍यांना अर्बन बँकेच्या माध्यमातून 50 – 50 हजार रूपये कर्ज उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे विरोधकांनी सांगावे की ते कोणत्या विचाराचे वारसदार आहेत .. कारखाने बंद पाडायच्या ..संस्था बंद पाडायच्या? .. यामुळे माझी विनंती आहे सर्वांनी निवडणूक ही कोणत्याही भावनेवर होत नसते, सध्या होवू घातलेली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही तुमच्या माझ्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने महत्वाची असून लोकशाहीने आपल्याला दिलेली ही संधी आहे. या संधीचे सोने करून घ्यायचे असल्याने भाजपाचे समाधान आवताडे यांना विजयी करण्याचे आवाहन परिचारक यांनी केले. यावेळी परिचारक यांनी मागील अकरा वर्षापासून आपण मंगळवेढ्यातील पस्तीस गावांच्या पाण्या प्रश्‍न सोडविणार तसेच एमआयडीसी आणणार .. असे ऐकत होतो. मात्र प्रत्यक्षात काय झाले? असा सवाल केला.
दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील परिचारक समर्थकांची बैठक देखील पार पडली असून यास आमदारद्वय प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा.लक्ष्मण ढोबळे, भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, विजय बुरकूल, गौरीशंकर बुरकूल, अरूण किल्लेदार, औदुंबर वाडदेकर, चंद्रशेखर कोंडूभैरी, काशीनाथ पाटील, मधुकर चव्हाण, बबलू सुतार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यात परिचारक यांनी आपण या निवडणुकीत कुणाला संपवायला एकत्र आलेलो नाही तर जिंकण्यासाठी एक झालो आहोत. या पोटनिवडणुकीने गुलाल खेळायची संधी दिली आहे.यावेळी त्यांनी सर्वांना समाधान आवताडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले की, येथे भापजाची उमेदवारी देण्याबाबत एकत्र बसून समझोता झाला असल्याने कोणीही मान-अपमानात न अडकता आवताडे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागावे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!