कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या प्रतिबंधक उपाय योजना सुरू

*कोरोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही

*कोरोनामुळे मृत्युचे प्रमाण केवळ अडीच टक्के

*खबरदारीच्या उपायासाठी नागरिकांनी मास्कऐवजी रुमाल वापरावा

*समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सायबर क्राईमला निर्देश

मुंबई, दि. 4 : कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करु या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.

यासंदर्भात विधानपरिषदेत सदस्य प्रकाश गजभिये यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले की, राज्यशासनाने या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण तयारी केली आहे. आतापर्यंत मुंबईत आलेल्या 551 आंतरराष्ट्रीय विमानातील 65 हजार 121 प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून 401 प्रवाशी आले असून आतापर्यंत 152 प्रवाशांना विविध रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी 149 लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 143 जणांना घरी सोडले आहे. सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर रुग्णालयात निरिक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल आहेत.

महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची देखील तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 30 जहाजांमधील 676 प्रवाशांची तपासणी केली त्यात संशयीत रुग्ण आढळून आला नाही. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार चीनसह 12 देशांमधून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आता मात्र सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जात असून प्रत्येकाला स्वघोषणापत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे.

देशात सध्या केरळ, दिल्ली आणि तेलंगणा येथे अनुक्रमे तीन व प्रत्येकी एक असे पाच रुग्ण स्थानिक रुग्णालयांनी केलेल्या चाचणीनुसार पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. मात्र पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोनाची जागतिकस्तरावरील सद्यस्थिती स्पष्ट करताना आरोग्यमंत्री म्हणाले, चीनमध्ये 80 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 हजार 915 जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्ये 280 जणांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून इराणमध्ये 1 हजार जणांना बाधा होवून 66 जणांचा मृत्यू झाला आहे तर इटलीमध्ये 2 हजार जण बाधित असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये बाधितांची संख्या 4 हजार 300 असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई येथे कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

केंद्रशासनाच्यावतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून 6 मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काही डॉक्टर त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षीत केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीट, एन-95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग, दृकश्राव्य माध्यमांवर जाहिराती, चित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्याकरिता सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी यासंदर्भात प्रबोधनपर चर्चासत्र अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. स्वच्छ धुतलेला रुमाल वापरुन प्रतिबंध होवू शकतो असे सांगतानाच हे मास्क रुग्णालयातील कर्मचारी, बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी वापरावे. अशा मास्कची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला. सध्या इराणमध्ये 1 हजार 200 विद्यार्थी आणि नागरिक अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही, असे आश्वस्त करतानाचा सर्वांनी मिळून त्याचा मुकाबला करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदसय् सर्वश्री शरद रणपिसे, हेमंत टकले, महादेव जानकर, भाई जगताप, प्रशांत परिचारक, अनिकेत तटकरे, डॉ.रणजित पाटील, भाई गिरकर, विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, श्रीमती मनिषा कायंदे, विद्या चव्हाण, हुस्नबानो खलिफे आदींनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!