कोरोनाचे संकट संपूर्णतः संपले नसल्याने माघी यात्रेत दशमी व एकादशीला श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर बंद राहणार

पंढरपूर – कोरोना विषाणूचा प्रसार देशात व राज्यात मंदावला असला तरी अद्याप संपूर्णतः हे संकट दूर झालेले नाही. याबाबत केंद्र व राज्य सराकर यासह स्थानिक प्रशासन योग्य ती खबरदारी घेतच आहे. या विषाणूंमुळे यात्रा,जत्रांवर मागील एक वर्षापासून निर्बंध आले आहेत. पंढरपूरला भरणार्‍या चैत्री, आषाढी, कार्तिकी या वर्षातील मोठ्या यात्रा यामुळे रद्दच झाल्या होत्या तर आता माघी यात्रेत 22 व 23 रोजी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

17 मार्च 2020 ला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मंदिरे बंद करण्याचा निर्णय झाला होता. यामुळे एप्रिल 2020 मध्ये आलेली चैत्री यात्रा रद्द झाली. यानंतर कोरोनाचा प्रसार वाढतच राहिल्याने आषाढी व नंतर कार्तिकी यात्रेवरही निर्बंध आले. दिवाळी पाडव्याला 16 नोव्हेंबर 2020 ला मंदिर उघडण्यास सशर्त परवानगी मिळाली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील पदस्पर्श दर्शन बंद करून केवळ मुखदर्शन देण्याचा निर्णय झाला. तसेच सुरूवातीला 20 जानेावारीपर्यंत दर्शनासाठी ऑनलाइन पास अनिवार्य होता. मात्र आता ओळखपत्र पाहून दर्शनासाठी सोडले जात आहे. यासाठी कोरोनाविषयक आरोग्य नियम पाळण्याची अट आहे.

आता माघी यात्रा जवळ आली असून 23 जानेवारी रोजी एकादशी आहे. या काळात दशमी व एकादशी म्हणजे 22 व 23 जानेवारी रोजी दोन दिवस विठुरायाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. याबाबत झालेल्या बैठकीस सदस्य भास्करगिरी महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अ‍ॅड.माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

कोरोना अद्याप पूर्णतः हद्दपार झाला नसल्यानेच राज्य सरकारने 28 फेबु्रवारीपर्यंत निर्बंध जाहीर केले आहेत. याच दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी माघी एकादशी येत असल्याने दोन दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. जेणे करून येथे गर्दी हेाणार नाही.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!