कोरोनाबाबत निष्काळजीपणा दाखवू नका; आमदार प्रशांत परिचारक यांचे भेटावयास येणार्‍यांना आवाहन

पंढरपूर– कोरोना हा एक भयंकर रोग असून याबाबत निष्काळजीपणा करू नका. अनेक तरूण याकडे दुर्लक्ष करीत असून याचा फटका घरातील वृध्द व स्त्रियांना बसत आहे. म्हणून बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, आपली व कुटुंबाची काळजी घ्या असे कळकळीचे आवाहन आमदार प्रशांत परिचारक भेटावयास येणार्‍या प्रत्येक तरूण कार्यकर्ते व सहकार्‍यांना करीत होते.
जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे १७ ऑगस्ट रोजी कोरोनामुळे निधन झाले. यावेळी परिचारक कुटुंबातील अकरा जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे कुटुंबातील काही सदस्य रूग्णालयात तर काही सदस्य क्वारंटाइन होते. यामुळे स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या निधना नंतर कार्यकर्ते, जिल्ह्यातील मान्यवर परिचारक कुटुंबातील सदस्यांना भेटू शकले नव्हते. दरम्यान कुटुंबातील सर्वांचा क्वारंटाइन काळ संपल्या नंतर गुरूवारी प्रशांत परिचारक पंढरीत दाखल झाले. शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या वाड्या बाहेर त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
यावेळी भेटण्यास येणारी प्रत्येक व्यक्ती भावुक झाली होती. स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. भेटावयास येणार्‍या प्रत्येक व्यक्तीस प्रशांत परिचारक हे कोरोनाबाबत बेसावधापणा राहू नका असे आवाहन करीत होते. विशेषतः तरूणांना याबाबत दक्षता घ्या असा सल्ला त्यांनी दिला. तरूणांना कोरोनाचा फार त्रास होत नाही. यामुळे ते बेफिकीरपणे फिरताना व नियम मोडताना दिसतात. मात्र त्यांच्यामुळे घरातील वृध्द, समाजातील इतर व्यक्तींना फटका बसू शकतो. यासाठी काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी पंढरपूर शहर व तालुक्यासह मंगळवेढा तालुक्यातून अनेक मान्यवर परिचारक कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येत होती. पुढील काही दिवस प्रशांत परिचारक सकाळी दहा ते दोन व दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत वाड्यामध्ये भेटण्यास थांबणार आहेत.
कै. पंतांना अखेरपर्यंत शेतकऱ्यांचीच काळजी
यावेळी प्रशांत परिचारक यांनी स्व.सुधाकरपंत यांच्या अखेरच्या दिवसातील घटना सर्वां समोर मांडल्या. पुणे येथील सह्याद्री रूग्णालयात दाखल झाल्या नंतर देखील ते जवळच्या रूग्णांची चौकशी करीत होते. मोबाईल वरून पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांना वारंवार फोन करून शेतकर्‍यांना पोळ्याच्या आधी उसाचे बिल द्या अशी सूचना करीत होते. १५ व १६ ऑगस्ट रोजी सुट्टी असून १४ ऑगस्ट पूर्वी बँकेत रक्कम जमा करा असा निरोप त्यांनी कुलकर्णी यांना दिला होता. यामुळे मोठ्या मालकांनी अखेर पर्यंत सर्वसामान्याचा ध्यास घेतल्याची आठवण आमदार प्रशांत परिचारक यांनी भावुक होवून सांगितली.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!