कोरोनामुळे कार्तिकीही संचारबंदीच होतीय साजरी , गुरूवारी पहाटे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर – मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. यामुळे सर्वच धार्मिकस्थळ बंद करण्यात आली. पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे 17 मार्च 2020 ला दर्शनासाठी बंद झाले व यानंतर चैत्री व नंतर सर्वात मोठी आषाढी यात्रा भरू शकली नाही. आता कार्तिकीच्या काळात मंदिर उघडली मात्र यात्रांवर निर्बंध असल्याने प्रतीकात्मक वारी साजरी होत आहे. या यात्रेदरम्यान पंढरपूरमध्ये दोन दिवसांची संचारबंदी पुकारण्यात आली आहे. बुधवारी सर्वत्र शुकशुकाट होता.
उद्या 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून यानिमित्त शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी रात्रौ पंढरपूरमध्ये येत आहेत. गुरूवारी पहाटे 2.15 ते 4.00 दरम्यान श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा ते सपत्नीक करणार आहेत.


कार्तिकी यात्रा ही आषाढीप्रमाणेच संचारबंदीत साजरी होत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे भाविकांची गर्दी होवू नये यासाठी प्रतीकात्मक यात्रा साजरी केली जात आहे. येथे यासाठी मोठा बंदोबस्त तैनात असून पंढरीत येणार्‍या सर्व रस्त्यांवर तपासणी होत आहे.
पंढरपूर शहर यात्रांवर जगणारे म्हणून प्रसिध्द आहे. येथे चार मोठ्या यात्रा प्रतिवर्षी भरतात. आषाढी हा वारकरी संप्रदायाचा कुंभमेळाच मानला जातो. मात्र यंदा मार्च महिन्यापासून येथील मंदिर बंद राहिले आहे आणि चैत्री पाठोपाठ आषाढी यात्रा भरलीच नाही. मंदिरच लॉकडाऊनमुळे बंद राहिले. 2020 मध्ये अधिक महिना आला होता. यास पुरूषोत्तम मास म्हणून संबोधले जाते. तीन वर्षातून एकदा येणार्‍या अधिकात पंढरपूर दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते मात्र यंदा यावर्षी अधिक काळात मंदिर कोरोनामुळे बंदच होते. आता दुसरी सर्वात मोठी यात्रा कार्तिकी आली आहे. या काळात मंदिर उघडण्यात आली असली तरी यात्रांवर निर्बंध आहेत. यामुळे ऐन दशमी व एकादशीला पंढरपूरमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली आहे. या कालावधीत तीन दिवस श्री विठ्ठल रूक्मिणीचे मुखदर्शनही बंद आहे.
दिवाळी पाडव्यापासून कोरोनाविषयक आरोग्य नियम पाळून मंदिर उघडण्यात आली आहेत. यानंतर पंढरीत रोज दोन हजार भाविकांना मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या तीन मुख्य दिवशी मात्र गर्दी टाळण्यासाठी व संचारबंदी पाहता देवाचे दर्शनच बंद ठेवण्यात आले आहे. मागील तीन चार दिवसात पंढरीत भाविकांची संख्या दिसत होती. मात्र नंतर रस्त्यावरील वर्दळ मंदावली होती तर चंद्रभागा वाळवंटात नीरव शांतता होती. वाळवंटाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
पंढरपूरच्या यात्रा या रेकॉर्डब्रेक भरत असतात. कार्तिकीला प्रतिवर्षी पाच ते सहा लाख भाविक येत असतात तर याच काळात जनावरांचा भरणारा बाजारही मोठा असतो. मात्र यावर्षी कोरोनामुळे यात्रा भरलेली नाही. सलग तिसरी वारी पंढरीत होवू शकली नाही. याचा फटका मंदिर परिसरासह शहरातील व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मंदिर बंदच्या काळात या परिसरात शांतताच होती. आता शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिली आहे.
महापूजेचा मान भोयर दांपत्याला


कार्तिकी एकादशी दिवशी उपमुख्यमंत्र्यांबरोबर श्री विठ्ठल व रूखुमाईच्या महापूजेचा मान श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात पहारा देणार्‍या एकूण 6 विणेकर्‍यांपैकी कवडुजी नारायण भोयर (वय 64 वर्षी रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) यांना मिळाला आहे. कवडुजी भोयर हे मागील 9 ते 10 वर्षापासून मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय माळकरी आहेत. मागील 8 महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत. त्यांच्यासमवेत उद्या त्यांच्या पत्नी सौ. कुसुमबाई भोयर (वय 55) या महापूजेत सहभागी होतील.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!