कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा, सर्वपक्षीय बैठकीत पालकमंत्री भरणे यांचे आवाहन

सोलापूर, दि.3 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभागातील व परिसरातील नागरिकांना लोकप्रतिनिधींनी घरी राहण्याच्या सूचना द्याव्यात. शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे. सकारात्मक भूमिका ठेवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत केले.पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.पालकमंत्री भरणे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड, नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासंदर्भात शासनाच्या, महानगरपालिकेच्या व खासगी दवाखान्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. आता कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या संकटकाळात शासन नागरिकांसोबत आहे. सर्व खबरदारी व उपाययोजना केल्या जात आहेत. उपचारासाठी, उपायोजनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात आली आहे.यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, गुरुशांत धुत्तरगावकर, महेश कोठे, राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, श्रीनिवास करली, कामिनी आडम, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, गणेश पुजारी, जुबेर भगवान, प्रशांत इंगळे आदींनी विविध सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचे शासनाकडून निश्चितच दखल घेण्यात येत असल्याची ग्वाही पालकमंत्री भरणे यांनी दिली.

विडी उद्योगाबाबत सकारात्मक निर्णय

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात असलेला विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात येत्या दहा-पंधरा दिवसानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. विडी उद्योग करण्यासंदर्भात विडी उद्योग प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी विडी कामगारांच्या समस्या सांगितल्या. कारखानदारांनी विडी कामगारांना ॲडव्हान्स स्वरूपात मदत करण्यासंदर्भात सूचना पालकमंत्री भरणे यांनी केल्या. सोलापुरातील कोरोना परिस्थिती पाहून शासनाच्या निकषानुसार विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!