कोरोना रूग्णसंख्येत पंढरपूर शहराला तालुक्याच्या ग्रामीण भागाने टाकले मागे..

पंढरपूर-पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. सुरूवातीला शहरात रूग्णसंख्या मोठी होती मात्र आता ग्रामीणचा आकडा सर्वाधिक झाला आहे. आजवर पंढरपूर शहरात 2227 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 2232 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसांपर्यंत पंढरपूर शहरात कोरोना रूग्ण मोठ्या संख्येने सापडत होते. मात्र आता शहरात कमी आणि ग्रामीण भागात जास्त अशी स्थिती आहे. यामुळे गुरूवारी ग्रामीण भागाने शहराला एकूण आकडेवारीत मागे टाकले आहे. गुरूवार 24 सप्टेंबरच्या अहवालानुसार शहरात 19 तर ग्रामीणमध्ये 58 नवे रूग्ण आढळले आहेत. याबरोबरच ग्रामीणचा एकूण बाधितांचा आकडा ही शहरापेक्षा आज जास्त झाला आहे.
शहरी भागात 2227 रूग्ण सापडले असून येथे 56 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. याची टक्केवारी 2.51 होते तर पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात 2232 रूग्ण सापडले असून यापैकी 53 जणांचा मृत्यू झाला आहे. याची टक्केवारी 2.37 आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांमध्ये ग्रामीणचे 619 तर शहरातील 429 रूग्ण आहेत. आजवर पंढरपूर शहरातील 1742 तर ग्रामीणमधील 1560 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पंढरपूर तालुक्याचा एकत्रित विचार केला तर एकूण रूग्ण संख्या ही 4459 इतकी झाली असून यापैकी 109 जण मरण पावले आहेत. सध्या 1048 जण उपचार घेत आहेत तर 3302 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!