घरगुती वीज बिल माफीसाठी १० ऑगस्टला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

कोल्हापूर दि. ३ – “दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करणेत यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी” या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृति समिती यांनी सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन जाहीर केले आहे.

कोल्हापूर प्रमाणेच राज्यात सर्व जिल्ह्यांतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच वेळी धरणे आंदोलन करावे असे आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, आर. के. पवार व सर्वपक्षीय प्रमुखांनी केले आहे.

या मागणीसाठी प्रथम दि. १३ जुलै रोजी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तर अनेक ठिकाणी तालुक्यांमध्ये, गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिकाक्षेत्रात झाले. यानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २०% ते ३०% सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापि ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही, तर उलट आजच्या कोरोना सद्यस्थितीत त्यांच्या अडचणींवर आणि दुःखावर मीठ चोळणारी आहे. राज्यातील ८०% हून अधिक वीज ग्राहकांची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीज बिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे हे ३ महिन्यांचे वीज बिल ग्राहक भरणार नाहीत असा निर्धार व जाहीर आवाहन या बैठकीद्वारे एकमताने करण्यात आलेले आहे. तसेच उर्जामंत्री यांनी जाहीर केलेल्या “दरमहा १०० युनिटस च्या आतील ग्राहकांना मोफत वीज” या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी अशीही मागणी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आला आहे.

शाहू कॉलेज येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर श्रीमती निलोफर आजरेकर या होत्या. या बैठकीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी, आ. चंद्रकांत जाधव, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, महेश जाधव, बजरंग पाटील, आर. के. पवार, बाबा पार्टे, विजय सुर्यवंशी, कॉ. चंद्रकांत यादव, बाबा इंदुलकर, एड. रणजित गावडे, महादेवराव आडगुळे, बाबासाहेब देवकर, भारत पाटील, दिलीप देसाई, राजेंद्र सुर्यवंशी, संदीप कवाळे, राजेंद्र पाटील, विक्रांत पाटील किणीकर, समीर पाटील, विक्रम जरग, मारुतराव कातवरे हे मान्यवर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

धरणे आंदोलन व निवेदन या सर्व प्रसंगी योग्य अंतर ठेवणे व मास्क वापरणे याबाबत सर्व शासकीय सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी अशी सूचना सर्वांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर जेथे शक्य वा आवश्यक असेल, तेथे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात यावे. त्याचबरोबर राज्यातील घरगुती वीज ग्राहकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना हजारोंच्या संख्येने ईमेल पाठवावेत आणि संपूर्ण वीज बिल माफी ची मागणी करावी, तसेच दि. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाल्यास राज्यातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये वीज बिल माफी मागणीचे ठराव करावेत व ठरावांच्या प्रती राज्य सरकारकडे पाठवाव्यात असेही आवाहन या सर्वपक्षीय समितीतर्फे करण्यात आले आहे.

One thought on “घरगुती वीज बिल माफीसाठी १० ऑगस्टला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

  • March 4, 2023 at 6:48 am
    Permalink

    From some point on, I am preparing to build my site while browsing various sites. It is now somewhat completed. If you are interested, please come to play with casino online !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!