जनतेशी नाळ जोडलेले विकासाभिमूख नेतृत्व विजयदादा..

2014 ला देशात भाजपा व नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली. प्रतिकूल परिस्थितीत विजयदादांनी ही जागा जिंकली. वास्तविक पाहता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यावेळी या मतदारसंघाचे खासदार होते मात्र त्यांनी लोकसभा न लढविता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. अशावेळी मोहिते पाटील यांच्या विजयाचे विश्‍लेषण अनेकांनी केले तेंव्हा विजयदादा उमेदवार असल्यानेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना स्वीकारले हे दिसून आले व याचे मोठे कारण होते त्यांची जनतेशी जोडली गेलेली नाळ.

प्रशांत आराध्ये
आज 12 जून विजयसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस आहे. राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या विजयदादांच्या राजकीय, सामाजिक, सहकार व विविध क्षेत्रातील कामाचा आढावा घेतला तर त्यांनी जे यश मिळाले, जी माणसं त्यांनी जोडली ती केवळ त्यांच्या सच्चेपणा आणि मनमिळावू स्वभावामुळे. राजकारणात कदाचित या स्वभावामुळे त्यांना अनेकदा तोटा ही सहन करावा लागला असेल पण त्यांनी त्याचा विचार न करता आपली वाटचाल सुरूच ठेवली. अनेक अडथळ्यांच्या शर्यती त्यांनी पार केल्या. त्यांच्याकडे उत्कृष्ट प्रशासक म्हणून पाहिले जाते. आज ही जिल्ह्याचा पालकमंत्री कसा असावा..याची चर्चा जेंव्हा पत्रकारांमध्ये रंगते तेंव्हा आपसूकच विजयदादांचे नाव सर्वात अगोदर निघते. कारण सरपंचापासून ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी काम पाहिले आहे. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभेचे ते सदस्य राहिले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबर कशा पध्दतीने काम करावे लागते याचा दांडगा अनुभव त्यांना आहे. देशात एकहाती भाजपाला सत्ता मिळवून देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयदादांचे अकलूजच्या सभेत कौतुक केले हे याचेच द्योतक म्हणावे लागेल.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी अनेक मंत्रालयांचा भार सांभाळला आहे. ते ग्रामविकासमंत्री असताना ग्रामीण रस्त्यांसाठी त्यांनी प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत सर्वाधिक निधी केंद्राकडून त्यांनी खेचून आणला होता. विजयदादांचे नेतृत्व हे विकासाभिमूख आहे. त्यांनी आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा पाहिला तर रस्ते विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ज्या प्रमाणे आज देशात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नाव या क्षेत्रात घेतले जाते व त्यांना गंमतीने रोडकरी असे संबोधले जाते तसेच विजयदादांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा कारकिर्दीत अनेक महत्वाचे रस्ते प्रकल्प पूर्ण केले आहेत. आज आळंदी व देहूहून पंढरपूरला जे तीन पदरी पालखी मार्ग दिसतात ते विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच कारकिर्दीतील काम आहे. आषाढीत पालख्यांच्या सोयीबरोबरच अन्य काळात जनतेच्या हितासाठी त्यांनी पालखी मार्ग विकसित केले ज्यामुळे ग्रामीण व शहरी भागांना याचा फायदा झाला. यानंतर अनेक पालखी मार्गांच्या घोषणा झाल्या व त्याची कामे सुरू झाली. जेंव्हा सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचा विषय निघतो तेंव्हा सर्वांना विजयदादांचीच आठवण होते. ते या विभागाचे मंत्री असताना येथे सर्वाधिक रस्ते विकास झाला होता.

अनेक दशकं रेंगाळलेल्या पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गाला मंजुरी मोहिते पाटील यांच्याच प्रयत्नाने मिळाली. केंद्रात भाजपाची सत्ता असताना विजयदादांनी आपल्या खासदारीचा उपयोग करून घेत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला व ही यास मान्यता मिळविली. यासाठी काही निधीची तरतूद ही करण्यात आली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्याबरोबरच सातारा भागाचा ही विकास होण्यास मदत मिळणार आहे. नीरा देवघरच्या पाण्यासाठी मोहिते पाटील हे आग्रही असून देवघरचे पाणी कॅनॉल (बंद पाइपालाइन)द्वारे लाभक्षेत्रात यावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यामुळे माळशिरससह अन्य भागाला ही फायदा होईल.

विजयदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांनी कृृृष्णा खोर्‍यातील समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वळूवन ते पाणीटंचाईग्रस्त भागाला देण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आखली. याचा उपयोग सातारा, सांगली , सोलापूर जिल्ह्यांसह मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी होवू शकतो. ही योजना मोठी व खर्चिक असली तरी याशिवाय कायमस्वरूपी या पट्ट्यातील दुष्काळ हटविण्याचा दुसारा पर्याय ही नाही. मोहिते पाटील यांनी आखलेली योजना म्हणून अनेक दिग्गजांनी त्यावेळी याकडे दुर्लक्ष केले. ज्यांना ही योजना पटली त्यांनी केवळ बड्या नेत्यांना दुखावयाचे नाही म्हणून बोटचेपी धोरण अवलंबिले आणि यात काळ उलटून गेला. मराठवाड्यासह सोलापूर व आजुबाजूच्या भागातून आज ही योजनेची मागणी पाणीटंचाईग्रस्त शेतकरी करत आहेत. हजारो हेक्टर क्षेत्राला संजीवनी देणारा हा प्रकल्प असून यास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने पूर्णत्वास नेण्याचा इरादा व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान हा विषय पुढे आला. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करताना ही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबवावी अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सहकारक्षेत्रात विजयसिंह मोहिते पाटील यांचे काम मोठे आहे. उजनी व नीरेच्या पाण्यामुळे सर्वाधिक ऊस पिकणार्‍या या भागात सर्वात जास्त साखर कारखाने निघाले. सहकार चळवळ येथे प्रबळ बनली. यातून अनेक नेते जिल्ह्यात तयार झाले. मोहिते पाटील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या समवेत काम केलेल्या जुन्या जाणत्या नेत्यांशी जुळवून घेत तालुका तालुक्यात सहकाराची चळवळ रूजवली. आज अनेक साखर कारखाने, दूध संस्था, सूत गिरण्या,वित्तीय संस्था यासह विविध प्रकल्प जे उभे दिसतात यामागे मोहिते पाटील व त्यांच्या सहकार्‍यांची मेहनत आहे. साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करून ते इंधनात मिसळण्याच्या योजनेला विजयदादांनी उचलून धरले. अनेक वर्षे ते इथेनॉल असोशिएशनचे अध्यक्ष होते. साखर संघ असो की शिखर बँक सर्वत्र त्यांनी काम पाहिले आहे.

राजकारणात विजयदादांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे. काँग्रस असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. अडचणीच्या काळात स्वतःचा फायदा करून घेण्यापेक्षा नेतृत्वाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. कदाचित या स्वभावामुळेच त्यांना काहीसे राजकीय नुकसान ही सहन करावे लागले हे दिसून येते. मात्र त्यांनी राजकारण, सहकारीतील आपल्या सहकार्‍यांचा विचार करत सर्वांच्या विचाराने अनेक निर्णय घेतले व याचे परिणाम होतील ते ही भोगले. मात्र चेहर्‍यावर ताण कधीच दिसू दिला नाही. सतत हसतमुख राहणार्‍या विजयदादांनी सर्व परिस्थितींवर मात केली. राजकारणात अनेक कटू प्रसंग आले. मात्र त्यांनी त्याचा सामना केला. त्यातून पुन्हा तावून सुलाखून आपले कर्तृत्व सिध्द केले आहे.

आज विजयदादांचा वाढदिवस असून त्यांना मनापासून शुभेच्छा..

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!