जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर राजकारणात स्थान निर्माण करणारा लोकनेता

प्रशांत आराध्ये
पंढरपूर- जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कै. आमदार भारत भालके यांनी जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या नानांनी तीन वेळा सलग आमदारकीची निवडणूक दिग्गजांना पराभूत करत जिंकली. मुळात पैलवान असल्याने प्रतिस्पर्ध्याची चाल ओळखण्याचा गुण त्यांच्यात होताच आणि या जोरावर त्यांनी मागील पंधरा वर्षात पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने या मतदारसंघाचे अतोनात नुकसान झाले असून सर्वसामान्य जनतेचा हक्काचा नेता हरपला आहे.
आमदार भारत भालके यांना कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. ते तालुक्याचे भाग्यविधाते कै. औदुंबरआण्णा पाटील यांच्या सहवासात आले आणि त्यांचे आयुष्य बदलले. कै. भारतनाना हे तालुक्यातील शेतकर्‍यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक बनले. नंतरच्या काळात कारखान्यावर सत्तांतर झाले. कै. वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष झाले. 2002 मध्ये त्यांच्या निधनानंतर कारखान्याची सूत्र भारत भालके यांच्याकडे आली. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल व पांडुरंग परिवार अशी साखर कारखानदारीवरून गट आहेत. सहाजिकच विठ्ठलचे अध्यक्षपद भालके यांच्याकडे आल्यानंतर ते विठ्ठल परिवाराचे नेते बनले. 2004 ला त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढविली तर याच वेळी स्व.राजूबापू पाटील अपक्ष तर कै. सुधाकरपंत परिचारक हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. यात परिचारक विजयी झाले. मात्र याच निवडणुकीत भालके यांचा राजकीय उदय झाला.
या निवडणुकीनंतर भालके यांनी आपले गुरू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यानच्या काळात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचनेचे काम सुरू होते. या काळात भारतनानांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा अभ्यास केला व 2009 च्या निवडणुकीची तयारी केली. मंगळवेढा भागात त्यांचा दांडगा संपर्क राहिला आहे. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी 2009 ला सुधाकरपंत परिचारक, भारत भालके हे इच्छुक होते. मात्र पुनर्रचनेमुळे तत्कालीन जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांचा माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांना निवडणूक लढविण्यासाठी जागा नव्हती. माढ्यात आमदार बबनराव शिंदे जागा देण्यास तयार नव्हते यामुळे पक्षाने मोहिते पाटील यांना पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात पाठविले. यासाठी परिचारक राजी झाले मात्र भारत भालके यांनी मतदारांच्या भरोशावर येथून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले. एका बाजूला सर्व प्रबळ नेते असताना नानांनी एकाकी झुंज दिली. रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे तिकिट घेतले. एकाकी झुुंजणार्‍या भारत भालकेंच्या पाठीशी जनता उभी राहिली आणि 38 हजार मतांनी विधानसभेची निवडणूक ते जिंकले. याच वेळी त्यांच्या वर्क्तृत्वशैलीची ओळख जिल्ह्याला झाली. स्वतःच स्टार प्रचार बनून त्यांनी एकहाती निवडणूक जिंकली.
मोहिते पाटील यांना पराभूत करून विधानसभेत पोहोचल्याने भालकेंची क्रेझ राज्यभर निर्माण झाली. यानंतर त्यांनी मंगळवेढ्याच्या दुष्काळी पट्ट्यातील पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. यासाठी विशेष योजना मंजूर करून घेतली. आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडे भेटायला येणार्‍या प्रत्येकाची ते स्वतः चौकशी करत. अनेक गरजूंना त्यांनी स्वःताच्या खिशातून मदत केली. त्यांच्या गाडीला जरी कोणी हात दाखविला तर ते थांबून त्यांची समस्या जाणून घेत. यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी ते हक्काचा माणूस बनले. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची चौकशी करत. यामुळे 2009 ते 2014 च्या काळात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात त्यांच्याबद्दल आदराचे वातावरण निर्माण झाले. विधानसभेत विविध प्रश्‍न मांडून मतदारसंघातील समस्या सोडवून घेत. त्यांचे वर्क्तृत्व अत्यंत प्रभावशाली असल्याने याचा उपयोग त्यांनी करून घेत विविध प्रश्‍नांना वाचा फोडली. मंगळवेढ्याच्या पाणी योजनेसाठी जंग जंग पछाडले. तत्कालीन काँगे्रसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांना साथ देत मतदारसंघातील कामे करून घेतली.
2014 ला राज्यात महायुतीची हवा दिसत होती, लोकसभेला भाजपाचे सरकार केंद्रात आले होते. यानंतर याच वर्षात विधानसभा निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंढरपूरला आले. तत्पूर्वी राज्यात काँगे्रसमधून अनेकांनी अन्य पक्षात प्रवेश केला होता. मात्र भारतनानांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व विधानसभा लढविली. मोदींची प्रचारसभा पंढरपूरला होवून ही येथे महायुतीचे उमेदवार प्रशांत परिचारक पराभूत झाले तर भालके हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचा अभ्यास करूनच त्यांनी काँगे्रसमध्ये प्रवेश केला व ते विजयी झाले. राज्यात 2014-19 या कालावधी भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होती. भालके विरोधी बाकावर असले तरी या काळात सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडली. अनेक प्रश्‍न सभागृहात उपस्थित केले. या काळात फडणवीस हे देखील त्यांच्या कामाने प्रभावी झाले होते. मराठा ,धनगर आरक्षण असो की अनेक मुद्दे भालके यांनी आपली रोखठोक भूमिका कायम ठेवली.
2019 मध्ये पुन्हा भाजपाला चांगले दिवस येतील असे चित्र दिसत होते. अशात भालकेंनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला व निवडणूक लढविली. यावेळी त्यांची लढत सुधाकरपंत परिचारक यांच्याशी झाली. भाजपाने परिचारक यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीपूर्वी भारत भालके हे आजारी होते मात्र जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या आजारावर मात केली व ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरले. त्यांचे गुरू शरद पवार तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे येथे प्रचाराला आले. सुधाकरपंत परिचारक हे मुरब्बी व जिल्ह्याच्या राजकारणातील प्रमुख नाव..त्यांच्या विरोधात लढताना देखील भालके यांचा विश्‍वास कायम होता. निकाल लागला आणि आमदार भारत भालके हे चांगल्या मतांनी विजयी झाले. सलग तिसरा विजय त्यांनी या मतदारसंघात मिळविला.
राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. कै. आमदार भालके यांनी वेळ पडली तेंव्हा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. जेंव्हा राज्यात काँगे्रसला गळती लागली तेंव्हा या पक्षाचे तिकिट घेवून विधानसभा जिंकली व नंतर 2019 ला राष्ट्रवादीबरोबर जात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव करून दाखविला. मात्र ते पहिल्यापासून शरद पवार यांनाच आपला मार्गदर्शक व गुरू मानत. पवार व भालके यांचे अत्यंत चांगले संबंध राहिले आहेत. शरद पवार यांनी विठ्ठल परिवाराला स्थापनेपासून म्हणजे कै. औदुंबरआण्णा पाटील यांच्या काळापासूनच साथ दिली आहे.
कै. आमदार भारत भालके यांचा राजकीय उदय हा एक झंझावात ठरला आहे. भल्या भल्यांना त्यांनी पराभूत करून आपले राजकीय कौशल्य दाखवून दिले आहे. जनतेच्या कामासाठी सहज व केंव्हाही उपलब्ध होणारा आमदार अशी त्यांची ओळख होती. कुणाच्या घरी लग्न, बारस , समारंभ अथव दुर्दैवाने कोणी मयत झालेले असो आमदार भारत भालके तेथे हजेरी लावत. ते जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत. अनेकांना त्यांनी मदत केली. यामुळेच ते नेहमी सर्वांना आपले वाटतात. आज कै. आमदार भारतनाना भालके आपल्यात नाहीत मात्र त्यांचे काम सदैव लक्षात राहिल.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!