दिलासादायक : पंढरपूरचा कोरोनामुक्तीदर 88% तर जिल्हा ग्रामीणचा 81 टक्के

पंढरपूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा कोरोनामुक्तीचा दर आता वाढत चालला असून सरासरी 81 टक्के रूग्ण येथे बरे होवून घरी गेले आहेत तर पंढरपूर तालुक्यात हाच दर 88 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळले असले तरी आजच्या तारखेला उपचार घेणार्‍यांची संख्या 551 इतकी आहे.
पंढरपूर तालुक्यात शनिवार 10 ऑक्टोंबरपर्यंत 5423 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद असून यापैकी उपचार घेणार्‍यांची संख्या 551 आहे तर आजवर कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या 4741 इतकी आहे. येथील कोरोनामुक्तीचा दर हा सर्वाधिक म्हणजे 87.48 टक्के इतका झाला आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात आजवर 131 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून तालुक्याचा कोरोना आजारामुळे मृत्यूदर हा 2.41 टक्के इतका आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर येथे (महापालिका क्षेत्र वगळून) एकूण रूग्णसंख्या ही 27 हजार 598 इतकी आहे. यापैकी 22339 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 4506 जणांवर जिल्हा ग्रामीणमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा ग्रामीणचा कोरोनामुक्तीचा दर 81 टक्के इतका झाला आहे. कोरोनामुळे ग्रामीणमध्ये 753 जणांनी प्राण गमावले असून येथील कोरोनामुळेचा मृत्यूदर हा 2.71 टक्के इतका आहे.

पंढरपूर शहरात 2571 तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 2852 कोरोनाबाधित आजवर आढळून आले आहेत. शहरात 2312 जण बरे झाले आहेत तर ग्रामीणमधील 2429 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या पंढरपूर शहरातील 197 जणांवर तर ग्रामीणमधील 354 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 62 तर ग्रामीणमध्ये 69 इतकी आहे.

4 लाख 47 हजार 300 नागरिकांची आरोग्य तपासणी

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरु केली आहे. यात शहरातील 96 हजार 238 व ग्रामीण क्षेत्रातील 3 लाख 51 हजार 71 असे एकूण 4 लाख 47 हजार 309 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 सप्टेंबर 2020 या मोहिमेतंर्गत प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील शहरी भागात 17 व ग्रामीण भागात 165 आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक शहरात प्रत्येक वार्डातील दररोज 50 घरांना तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील दररोज 50 घरांना भेटी देवून कुटुंबातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. यात कुटुंब सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तसेच कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेवून, ताप, खोकला, दमा, ऑक्सिजन पातळी कमी भरणे अशी कोरोना सदृश्य लक्षणे असणार्‍या नागरिकांची कोविड 19 ची तपासणी करुन आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले जात असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. ताप आल्यास सर्दी, खोकला, धाप लागणे, थकवा येणे अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही, प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!