नोकरीच्या मागे न लागता खेडभाळवणीत तीन तरुण अभियंत्यांनी उभारला एलइडी बल्बचा कारखाना , निर्माण केला स्वतःचा ब्रॅन्ड

प्रशांत वाघमारे
पंढरपूर, – कोरोनामुळे लॉकडाऊन काळात शहराकडे जाण्याचे रस्ते बंद झाले होते तर महानगरातील लोकच पुन्हा गावी आले. अशा स्थितीत येथील उच्च शिक्षित तीन युवक आकाश बनसोडे, ऋषिराज नाळे व सिताराम चव्हाण या तरुणांनी खेडभाळवणीत एलइडी बल्बचा कारखाना उभारुन स्वतःचा ब्रॅन्ड तयार केला आहे.
बेरोजगारीचा बाऊ न करता प्राप्त परिस्थितीत ग्रामीण भागातही उद्योगधंद्याची निर्मिती केली जावू शकते हे या तीन इलेक्ट्रिकल अभियंत्यांनी दाखवून दिले आहे. खेडभाळवणी येथील आकाश बनसोडे व पिराची कुरोली येथील ऋषिराज नाळे, सिताराम चव्हाण यांनी नोकरी करायची नाही तर स्वतःचाच उद्योग उभा करायचा हे ठरवून रास इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची स्थापना केली. खेडभाळवणी येथे आकाश बनसोडे यांच्या रानातच कारखाना उभारला व उत्तम दर्जाच्या एलइडी बल्ब, ट्यूब, मर्क्युरी दिव्यांची निर्मिती सुरु केली आहे. गुणवत्तापूर्ण निर्मितीमुळे सोलापूर जिल्ह्यातून या उपकरणांना एवढी मोठ्या प्रमाणात मागणी आहे की निर्माण केलेला मालच विक्रीसाठी शिल्लकच राहत नाही. उन्हाळा हंगाम पाहता सध्या हे तरुण कुलर निर्मितीही करीत आहेत.
अत्यंत गरीब परिस्थिती असणाऱ्या या अभियंत्यांनी ग्रामीण तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. प्राप्त परिस्थितीत स्वतःचा खर्च भागवण्यापुरतेही वेतन अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना मिळत नसल्याची ओरड आपण सतत ऐकत असतो. त्यावरती उद्योगनिर्मितीतून आपण स्वतःचे अस्तित्व तयार करु शकतो व इतरांनाही रोजगार देऊ शकतो हेच या तरुणांनी सिद्ध केले आहे. या उद्योगासाठी दीपक नळे, दत्तात्रय चव्हाण, सुरेखा बनसोडे, तुकाराम बनसोडे, रफिक शेख, महादेव साळुंखे हे मदत करीत आहेत. सरपंच डॉ.संतोष साळुंखे, नानासाहेब घालमे, लक्ष्मण साळुंखे, युवराज साळुंखे, पोपट घालमे, सत्यवान साळुंखे यांनी या तरुणांच्या कार्याचे कौतुक केले.

7 thoughts on “नोकरीच्या मागे न लागता खेडभाळवणीत तीन तरुण अभियंत्यांनी उभारला एलइडी बल्बचा कारखाना , निर्माण केला स्वतःचा ब्रॅन्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!