पंढरपूरची पोटनिवडणूक पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची, जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांकडून हालचाली सुरू

प्रशांत आराध्ये

कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी व त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जावी असा ही मतप्रवाह मतदारसंघात आहे. मात्र यास विरोधी पक्ष मान्य होणार का? हा खरा प्रश्न आहे. 2019 ला मतदारांनी कै. भारत भालके यांना चांगल्या मताधिक्क्याने विजयी केले होते. त्यांचा हा कौल पाच वर्षांसाठी होता. मात्र एकच वर्षात भारत भालके यांचे निधन झाले आहे. आता या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येत्या तीन चार दिवसात सर्वच राजकीय पक्षांकडून येथील उमेदवार निश्‍चित केले जातील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने आरोग्य विषयक सारे नियम पाळून प्रचार करावा लागणार असल्याने राजकीय पक्ष प्रचाराला पुसा वेळ म्हणून लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करतील याची शक्यता जास्त आहे.

पंढरपूर – आमदार कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात राज्य व जिल्हा पातळीवर याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर पक्षाअंतर्गत असणार्‍या कुरबुरींसह उमेदवार निश्‍चितीसाठी व प्रचाराच्या व्यूहरचनेसाठी वरिष्ठ पातळीवरून नियोजन सुरू झाले आहे. दरम्यान ही पोटनिवडणूक पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने सर्वचे नेते येथील विजयासाठी झटणार हे निश्‍चित आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भालके यांनी काँगे्रस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता व उमेदवारी घेतली होती. त्यावेळी राज्यात दोन्ही काँगे्रस पुन्हा सत्तेवर येतील अशी आशाच नव्हती. मात्र तरीही भालके यांनी शरद पवार यांची साथ करण्याचा निर्णय घेतला व यशस्वी झाला. त्यांच्या विजयासाठी शरद पवार व अजित पवार यांनी पंढरपूर व मंगळवेढ्यात सभा घेतल्या होत्या. निवडणुकीनंतर एक वर्षातच भारत भालके यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक आता जाहीर झाली आहे. खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही भालके कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भगिरथ भालके यांना बहाल करण्यात आले होते.आता विधानसभेची उमेदवारी भालके कुटुंबातच मिळेल अशी चर्चा आहे.
या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात पदाधिकारी बदलावरून कुरबुरी निर्माण झाल्या होत्या तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी कारखाना निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे जिल्ह्यात व तालुक्यात वातावरण तापले होते. राष्ट्रवादी व विठ्ठल परिवारातील अंतर्गत वादाकडे सार्‍यांचे लक्ष होते. याबाबत पक्षाचे पवार यांना सारी माहिती असणार हे निश्‍चितच आहे. विधीमंडळाचे अधिवेशन झाल्यानंतर आता पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पक्षातील स्थानिक संबंधित नेत्यांशी मुंबईत चर्चा केल्याचे समजते. शरद पवार व अजित पवार यांचा शब्द राष्ट्रवादीत अंतिम असतो. यामुळे सर्वांना पुन्हा एकत्र कसे आणायचे … हे पवार काका पुतणे जाणून आहेत.
दरम्यान विरोधी पक्षांकडून येथे जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने या जागेची चाचपणी केली असून अद्यापही या पक्षाकडून उमेदवार कोण असणार हे ठोसपणे पुढे आलेले नाही. मात्र आमदार प्रशांत परिचारक यांच्या पसंतीचा उमेदवार येथे दिला जाईल असे दिसत आहे. त्यांचे पुतणे प्रणव तसेच बंधू उमेश परिचारक यांच्या नावाची सध्या मतदारसंघात चर्चा आहे. 2014 व 2019 ला येथून लढलेले व मंगळवेढ्याचे असणारे उद्योजक समाधान आवताडे यांनीही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार करूनच तयारी केली आहे. त्यांना मागील निवडणुकीत 50 हजाराहून अधिक मते मिळाली होती. शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात सतत दौरे करत आहेत. मात्र ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढली जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्याकडूनच एकच उमेदवार दिला जावा यासाठीच प्रयत्न होणारे हे निश्‍चित आहे.
कै. भारत भालके राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. यामुळे पवार यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. महाविकास आघाडीत एकवाक्यता असल्याचा संदेश राज्यात जावा यासाठी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पवार हे मतदारसंघात व जिल्ह्यातील तीनही पक्षांच एकत्रित मोट बांधून या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे..पंढरपूरची पोटनिवडणूक ही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासाठी ही महत्वाची मानली जात आहे. येथे राष्ट्रवादीला आपली ताकद अबाधित ठेवण्यासाठी ही जागा ताब्यात ठेवणे गरजेचे आहे . तर भाजपा येथे आपला करिष्मा दाखविण्याचा प्रयत्न करणार हे दिसत आहे. येथील उमेदवार कोण असणार यावर बरेच काही अवलंबून आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!