पंढरपूर पोटनिवडणूकः मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेसचाही दावा, जागा लढविण्याची पदाधिकार्‍यांची मागणी

पंढरपूर – आमदार कै. भारत भालके हे 2009 मध्ये रिडालोसकडून लढून विजयी झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतलेले होते. 2009 ते 2019 या 10 वर्षांच्या काळात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेची जागा आघाडीत काँग्रेसकडेच पक्षाकडे होती. यामुळे पक्षाने आदेश दिल्यास आपण पोटनिवडणुकीत लढविण्यास तयार असल्याची माहिती जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.

दरम्यान यापूर्वीच महाविकास आघाडीमधील दुसरा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी बुधवारीच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महाविकास आघाडीतच येथील जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार कै. भारत भालके हे 2019 ला राष्ट्रवादीकडून लढले होते व विजयी झाले. मात्र त्यांचे आता निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक होत असून या जागेवर सहाजिकच राष्ट्रवादीने दावा केला आहे व उमेदवार जाहीर करण्याची तयारी केली आहे. येत्या एक दोन दिवसात येथील उमेदवार स्पष्ट होईल.

आता काँग्रेस पक्षातून पंढरपूरची जागा लढविण्याची मागणी होवू लागली आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे येथील जागा पक्षाने लढवावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, 2019 ला राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला न विचारता स्व. भारत भालके यांना उमेदवारी दिली होती. पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेची जागा पूर्वीपासून काँग्रेस पक्षाकडे असल्याने येथील पोटनिवडणुकीत पक्षाने उतरावे अशी मागणी आम्ही केली आहे.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. या दृष्टीकोनातून सध्या काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे सदरची जागा पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. पक्षाने जर आदेश दिला आपण येथून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे नागणे म्हणाले.

दरम्यान शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी केलेली आहे. मागील अनेक वर्षापासून या मतदारसंघात त्यांनी संपर्क वाढविलेला आहे.

One thought on “पंढरपूर पोटनिवडणूकः मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेसचाही दावा, जागा लढविण्याची पदाधिकार्‍यांची मागणी

  • March 6, 2023 at 1:51 am
    Permalink

    Very nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I’ve really enjoyed browsing your blog posts. In any case I’ll be subscribing to your feed and I hope you write again soon!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!