पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकः कोणते दादा होणार आमदार? भगीरथ भालके की समाधान आवताडे..

पंढरपूर – राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवार 2 मे रोजी होत असून याकडे सार्‍या राज्याचे लक्ष लागले आहे. एकोणीस उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भगीरथ भालके व भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे यांच्यात होत आहे. कोरोनाकाळातही निवडणूक अत्यंत चुरशीने झाली असून यात कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ही निवडणूक राज्यातील तीन प्रमुख पक्षांच्या सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
येथील आमदार कै. भारत भालके यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये निधन झाले होते. यामुळे या पोटनिवणुकीची घोषणा झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही येथे मोठ्या चुरशीने प्रचार झाला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने ही जागा राखण्यासाठी राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादीचे राज्यातील प्रमुख नेत्यांनी येथे जोरदार व्यूहरचना केली होती. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असणार्‍या भाजपाने ही जागा जिंकून सत्ताधार्‍यांना धक्का देण्यासाठी सारी ताकद पणाला लावल्याचे प्रचारात दिसत होते. या पक्षाने केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील नेत्यांच्या सभा येथे घेतल्या होत्या. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आजवर कधीही भाजपा अथवा महायुती विजयी झालेली नाही हा माहित असल्याने भाजपाने येथे मंगळवेढ्यातील मातब्बर नेते समाधान आवताडे यांना उमेदवारी देत पंढरपूरचे असणारे विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांना त्यांच्या पाठीशी उभे केले आहे. यामुळे आवताडे व परिचारक यांची ताकद एकत्र झाली आहे. यामुळे भाजपाला येथे विजय मिळेल अशी आशा आहे.
दुसरीकडे कै. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून सहानुभूती व या भागात दोन्ही काँग्रेसची असणारी ताकद या जोरावर विजय आपलाच असल्याचे महविकास आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. या पोटनिवडणुकीत राज्यातील ताज्या विषयांचा उहापोह झाला असून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. यामुळे ही निवडणूक आरोप व प्रत्यारोपांमुळे खूप गाजली आहे. सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने लढत प्रतिष्ठेची केली असून या तीनही पक्षातील नेत्यांनी येथे प्रचार केला आहे. भाजपाला पराभूत करून महाविकास आघाडी भक्कम असल्याचे त्यांना दाखवून द्यायचे आहे. मतदारांचा काय कौल आहे हे आता रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
कोरोनाकाळात होत असलेल्या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन पाटील यांना उमेदवारी देत निवडणूक लढवली आहे. या संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे प्रचार केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनीही निवडणूक लढविली आहे. त्यांना शिवसेनेने पक्षातून काढून टाकले आहे. हे दोन उमेदवार किती मतं घेणार याकडे सार्‍यांचे लक्ष आहे. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्‍वर आवताडे यांनीही या निवडणुकीत अपक्ष म्हणून सहभाग घेतला व झंझावाती प्रचार केला आहे. ते किती मतं घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवडणूक रिंगणातील 19 उमेदवार
भगीरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडिंबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्‍वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजित वामनराव आवाडे-बिचकुले, सुनील सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्‍वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडुरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे.
65.73 टक्के मतदान, मतमोजणीची तयारी पूर्ण
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी 65.73 इतकी आहे. रविवार 2 मे रोजी शासकीय धान्य गोदामात मतमोजणीसाठी 118 अधिकारी , कर्मचारी व मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होईल. 14 टेबलांवर 38 फेर्‍यात मतमोजणी पार पडले. 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाची मोजणी दोन टेबल होणार आहे. मतमोजणीसाठी 54 अधिकारी , कर्मचारी व मदतनीस राखीव ठेवण्यात आले आहेत. 80 वर्षांहून अधिक वय असणारे जेष्ठ नागरिक, दिव्यांग अशा 3 हजार 252 तर 73 सैनिक मतदारांनी टपाली मतदानाद्वारे हक्क बजावला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!