पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक चुरशीची होणार,  भाजपा आणि राष्ट्रवादीसमोर अनेक आव्हानं

पंढरपर- पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले असून 19 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्‍वर बबनराव आवताडे हे अपक्ष उतरल्याने हे मोठे आव्हानं मंगळवेढा तालुक्यात भाजपाच्या आवताडे गटासमोर असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे तर नुकतेच या निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केल्याने ज्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे त्या शैला गोडसे यांची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी थोडीफार नुकसानीची ठरू शकते.
या निवडणुकीत परिचारक यांना भाजपाने उमेदवारी न दिल्याने या गटाचे समर्थक शहराच्या राजकारणातील दिग्गज नेेते नागेश भोसले यांनी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने भाजपाच्या गोटात थोडा उत्साह संचारला आहे. मात्र मंगळवेढ्यातील बडे नेते बबनराव आवताडे यांचे चिरंजीव व सध्याचे भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिध्देश्‍वर आवताडे यांची उमेदवारी मात्र कायम राहिली आहे. ते अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सिध्देश्‍वर आवताडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे गेले तीन दिवस मंगळवेढ्यात त्यांची समजूत काढत होते. मात्र यास यश आले नाही. शनिवारी दुपारपर्यंत मोहिते पाटील हे मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांच्या निवासस्थानी होते.
सिध्देश्‍वर आवताडे यांच्या उमेदवारीचे आव्हानं भाजपासाठी मोठे असणार आहे. कारण मंगळवेढा भागात बबनराव आवताडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. यापूर्वी ही ताकद दोन निवडणुकांमध्ये समाधान आवताडे यांच्या पाठीशी होती. आता सिध्देश्‍वर आवताडे हे अपक्ष उमेदवार असल्याने मताच्या विभागणीचा धोका वाढला आहे. ते किती मतं घेणार हे येत्या काळात दिसून येईल. दरम्यान ही पोटनिवडणूक असली तरी आता अत्यंत चुरशीची होत असल्याचे चित्र आहे. 19 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
शिवसेनेच्या माजी जिल्हा आघाडी प्रमुख शैला गोडसे या एकमेव महिला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून जोमाने सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची या उद्देशाने त्यांनी उमेदवारी दाखल केली असून यासाठी त्यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली मात्र त्या निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्या आहेत. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. स्वाभिमानी पक्ष या निवडणुकीत उतरणार असल्याचे या पक्षाने अगोदरच जाहीर केले होते. पंढरपूर व मंगळवेढा भागात या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. ऊसदर व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर ही संघटना रस्त्यावर उतरत असल्याने ग्रामीण भागात समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत.

1,399 thoughts on “पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक चुरशीची होणार,  भाजपा आणि राष्ट्रवादीसमोर अनेक आव्हानं