पंढरपूर विधानसभा मतदारसंघाशी मोहिते पाटील यांचे जुने नाते , मात्र राजकीय परिस्थितीमुळे प्रत्येक निवडणुकीत बदलती भूमिका !

प्रशांत आराध्ये
पंढरपूर- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आणि अकलूजच्या मोहिते पाटील गटाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. 2009 ला विजयसिंह मोहिते पाटील हेच या पुनर्रचित मतदारसंघाचे पहिले उमेदवार होते. यासह येथे तीन निवडणुका आजवर पार पडल्या आहेत तर चौथी रणधुमाळी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू आहे. यात प्रत्येकवेळची राजकीय परिस्थिती पाहता मोहिते पाटील गटाची भूमिका बदलत गेली असल्याचे दिसून येते.
आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यासाठी चुरशीची लढत होत असून येथे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत आहे. अकलूजचे असणारे व भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर सहाजिकच भाजपाने या निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. आता मोहिते पाटील हे पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी मत मागत आहेत. येत्या काळात त्यांना या मतदारसंघात खूप काम करावे लागणार आहे असे हे निश्‍चित.
मुळात मोहिते पाटील व पंढरपूर मतदारसंघाचे नाते जुनेच आहे. 2009 ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि माळशिरस विधानसभाक्षेत्र राखीव झाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपूरची उमेदवारी दिली. अचानक जाहीर झालेल्या या उमेदवारीने येथील स्थानिक प्रबळ परिचारक गटात नाराजी पसरली आणि यानंतर भारत भालके यांनी स्वःताच स्टार प्रचारक बनत झंझावाती प्रचार केला व विजय संपादन केला. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला पराभूत करून विधानसभेत पोहोचलेल्या भालके यांची क्रेझ अखेरपर्यंत राहिली. सलग तीन निवडणुका ते जिंकले.
दरम्यान मोहिते पाटील यांना पराभव जिव्हारी लागला व याचे खापर परिचारक गटावर फोडले गेले. यानंतर परिचारक व मोहिते पाटील यांच्यातील दोस्ताना कमी झाला. मैत्रीत अंतर दिसून आले. यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर ,आघाड्या तयार झाल्या. यानंतर 2014 ला येथून महायुतीकडून प्रशांत परिचारक उभे राहिले होते. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांनी परिचारकांचा पराभव केला. त्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी 2009 चा हिशोब चुकता करण्यासाठी परिचारकांविरोधात प्रचार केल्याच्या त्यावेळी चर्चा खूप रंगत होत्या. कारण त्यावेळी करमाळ्यात संजय शिंदे व पंढरपूरमधून प्रशांत परिचारक हे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते. जिल्ह्याच्या राजकारणात याच युवा नेत्यांनी मोहिते पाटील गटाला राष्ट्रवादीत असतानाच अंतर्गत विरोध केल्याचे अनेक किस्से चर्चिले जातात.
दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेला मोहिते पाटील गट भाजपावासी झाला होता. यानंतर विधानसभेला पंढरपूरमधून ज्येष्ठ नेते स्व. सुधाकरपंत परिचारक यांना भाजपाने उमेदवारी दिली आणि यानंतर अकलूजमध्ये मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली व त्यांनी पंतांच्या पाठीशी ताकद लावली होती. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अनेक सभा घेतल्या. पंत आणि विजयदादा यांचे मैत्रीचे संबंध अत्यंत जुने होते मात्र 2009 च्या निवडणुकीनंतर यात अंतर पडले होते. ते 2019 ला कमी झाले व पुन्हा मैत्रीपर्वास सुरूवात झाली. मात्र त्या निवडणुकीत परिचारकांना पराभूत व्हावे लागले होते.
आता आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत असून पंढरपूर व मंगळवेढ्यातील मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते आता भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारात आहेत. बुधवारी अकलूजला शिवरत्न बंगल्यावर बैठक होवून यात आवताडे यांच्या पाठीशी ताकद उभे करण्याचा निर्णय झाला आहे. आवताडे हे 2014 ला याच मतदारसंघात शिवसेनेकडून तर 2019 ला अपक्ष लढले आहेत. आता 2021 च्या पोटनिवडणुकीत ते भाजपाचे उमेदवार आहेत.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा जिंकून दिल्याने भाजपात नवी दिल्ली ते मुंबर्इ त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले आहे. यासह आणखी जबाबदाऱ्या त्यांच्यावर दिल्या जावू शकतात.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!