पदवीधरांनी ध्येय निश्चित करून सदाचाराने आत्मनिर्भर व्हावे : राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाइन संपन्न; पुरस्कारांचेही वितरण

सोलापूर, दि.22- पदवीधर तरुण पिढीने मनाशी मोठा संकल्प करावा आणि निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली तर नवा भारत निर्माण होईल, असे मत महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यामध्ये राजभवनवरून या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होऊन राज्यपाल श्री कोश्यारी हे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शाह हाती ज्ञानदंड घेऊन सहभागी झाले होते.

राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले की, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी स्वावलंबनाचा विचार दिला. त्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर करा, असा असे आवाहन केले आहे. त्यानुसार आत्मनिर्भरतेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नवे संशोधन करण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा. यातून विद्यापीठाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले. कोविड महामारीने संपूर्ण जगाला वेढले आहे, अशा परिस्थितीमध्ये भारताने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून लस निर्मितीत पुढाकार घेतला, ही अतिशय चांगली बाब आहे, असे ते म्हणाले. भगवान श्रीराम आणि गौतम बुद्धांच्या या भारत देशामध्ये आपण त्यांचा आदर्श आजही घेतो, त्याचे कारण त्यांचा सदाचार हे होते. तरुणांनी हे लक्षात ठेवावे की, कोणतीही गोष्ट परिश्रम केल्याशिवाय साध्य होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये तरुण पिढीने निराश न होता समर्थ रामदासांनी सांगितलेला सदाचाराचा वसा घेऊन वाटचाल करावी, म्हणजे त्यांना यश निश्चितपणे मिळेल असेही ते म्हणाले.

*विद्यापीठाच्या प्रगतीबद्दल राज्यपालांकडून कुलगुरूंचे कौतुक*
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचे कौतुक करून महामहीम कोश्यारी म्हणाले की, विद्यापीठाने कोरोनाला दूर ठेवण्यास फोर इन वन उपकरण विकसित केले आहे, हे कौतुकास्पद आहे. पुढील दीक्षांत समारंभापर्यंत यापुढचे फाईव इन वन उपकरण विकसित करावे. मास्क निर्मिती व इतर संशोधनात देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने लोकल टू ग्लोबल हा नारा देत अग्रेसर आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या खूप चांगले कार्य करीत आहेत, याबद्दल त्यांचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक करत यापुढच्या काळात विद्यापीठाने अशीच प्रगती करावी, असे आवाहन केले.

*स्थलांतर रोखण्यासाठी विद्यापीठाने रोजगार निर्मितीवर भर द्यावा: सुभाष देशमुख*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेल्या सोळा वर्षात भरीव अशी कामगिरी केली आहे. आता स्थलांतर रोखण्यासाठी विद्यापीठाने रोजगार निर्मितीवर भर द्यावा, तशा पद्धतीचे कौशल्याभिमुख प्रशिक्षणाची सोय करावी. नवनवीन संशोधन करीत सोलापूरचे व देशाचे नाव वाढवण्यासाठी विद्यापीठाने कार्य करावे. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्र उभारणीसाठी योगदान द्यावे. आत्मनिर्भर भारतासाठी उच्च शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे, असे स्पष्ट मत माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटामुळे यंदा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यात प्रातिनिधीक स्वरुपात चार विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर चार विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदव्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी चारही विद्याशाखेच्या अधिष्‍ठातानी स्नातकांना सादर केल्यानंतर कुलपती श्री कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. याचबरोबर यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बबन यशवंतराव यादव यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल देऊन सन्मानित करण्यात करण्यात आले. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी मानले.

*यांचा पुरस्कार देऊन झाला सन्मान*

* उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज
* उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: के. एन. भिसे, आर्टस, कॉमर्स ॲन्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, कुर्डूवाडी
* उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य, डॉ. बब्रुवाहन पांडूरंग रोंगे, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर
* उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: डॉ. विष्णू पांडूरंग शिखरे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी
* उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: कैलास वसंतराव देशमुख, प्रबंधक, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!