परप्रांतीयांना घरी पोहोचविण्यासाठी लाल परीचा १५२ .४२ लाख कि.मी.चा प्रवास

मुंबई दि. ९ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यात आपल्या घरी परत जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एस.टी.च्या लालपरीची मोठी सुविधा उपलब्ध झाली. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना घेऊन रेल्वेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यादेखील राज्याच्या चोहोबाजूला असलेल्या विविध राज्यांच्या सीमेपर्यंत धावल्या. ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरित नागरिकांना रेल्वे स्थानक आणि त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी ३१ मे पर्यंत या एस.टी बसगाड्यांनी तब्बल १५२.४२ लाख कि.मी चा प्रवास केला.

महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना सुखरूप परतता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या.एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवले, त्यासाठी राज्य शासनाने १०.८९ कोटी रुपयांचा खर्च केला.

औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा एस.टी. महामंडळाच्या सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली.

*२ लाखाहून अधिक लोकांना रेल्वेस्टेशनवर पोहोचवले*

उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचलप्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्याचे काम एस.टी महामंडळाच्या बसेसने केले. २ लाख २८ हजार १०० नागरिकांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला.

*३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले*

गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत धावून एस.टीने त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले, या सुविधेचा तब्बल ३ लाख ०९ हजार ४९३ नागरिकांनी लाभ घेतला.

‘या’ जिल्ह्यांमधून उपलब्ध झाल्या बसेस

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून एस.टी. बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!