पवार व फडणवीसांनी माढा मतदारसंघ केला प्रतिष्ठेचा

शह व काटशहाच्या राजकारणाने गाजतोय सोलापूर जिल्हा

माढा लोकसभा मतदारसंघ हा देशभरात गाजत आहे. अगोदर येथून राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची उमेदवारी निश्‍चित झाली व नंतर त्यांनी उभारण्यास नकार दिला. यापाठोपाठ त्यांच्याच पक्षातील मातब्बर नेते व येथील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व राष्ट्रवादीला जबर धक्का दिला. यास उत्तर देताना आता पवारांनी आपला डाव टाकत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात आणले आहे. माढ्यात विजय मिळविण्यासाठी भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यूूहरचना आखत आहेत तर दुसरीकडे कोणत्याही स्थितीत माढा आपल्याकडेच राखायचा यासाठी शरद पवार प्रयत्नशील असल्याने या दोघांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
शह व काटशहाचे राजकारण सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. माढ्यातून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्या समोर ठेवण्यात आला व त्यांनी मान्य करत येथून तयारी सुरू केली. मात्र त्यांचे नातू पार्थ अजित पवार हे मावळ मधून उभारण्यासाठी इच्छुक असल्याने माढा, बारामती व मावळ या तीन ठिकाणी एकाच घरातील उमेदवार नकोत म्हणून पवार यांनी माघार घेत या जागेसाठी उमेदवार शोधण्यास सुरूवात केली. या दरम्यानच्या काळात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील सततच्या खच्चीकरणाला कंटाळून उमेदवारी न घेता शांत बसणे पसंत केले . तर त्यांचे चिरंजीव भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले. यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मोलाचे काम केले.
जिल्ह्यात भाजपाच्या जवळ असणार्‍या महाआघाडीचे नेते असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक यांचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी सूत जुळलेले नाही. हे नेते पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाचे आहेत. यामुळे सहाजिकच सुभाष देशमुख यांना साखरपट्ट्यात या महाआघाडीच्या नेत्यांना शह देण्यासाठी मोहिते पाटील यांच्यासारखा तगडे नेतृत्व हवेच होते. आता मोहिते पाटील भाजपात आल्याने राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. ज्या माढ्याचे नेतृत्व पवार यांनी केले व आज ही त्यांचे या मतदारसंघावर जास्त लक्ष असते तेथील विद्यमान खासदारांचा मुलानेच पक्ष सोडल्याने हा राज्यभर चर्चेचा विषय झाला.
मोहिते पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात घेतले व जंगी स्वागत केले. यास भाजपाचे अनेक नेते उपस्थित राहिले. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला आहे. येथेच आता मातब्बर नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पवार यांनी हा विषय प्रतिष्ठेच बनविल्याचे चित्र आहे. त्यांनी तातडीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत आणले आहे. शिंदे व पवार यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत.
माढा मतदारसंघ कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादीकडेच राहिला पाहिजे असा पवार यांचा प्रयत्न आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2009 मध्ये शरद पवार यांच्यासाठी तर 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी हा भाग पिंजून काढला होता. त्यांचा येथे जनसंपर्क असल्याने 2019 च्या निवडणुकीत भाजपाला याचा फायदा होईल असे चित्र आहे तसेच राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्याच गटाचे असणे ही जमेची बाजू म्हणावी लागणार आहे.
शरद पवार हे देशातील मातब्बर नेते असून राजकीय खेळ्या करण्यात ते अत्यंत निष्णात मानले जातात. आजवर अनेकदा हे सिध्द झाले आहे. मोहिते पाटील जरी भाजपात गेले असले तरी ते माढा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राखण्यासाठी हरएक प्रकारच्या खेळ्या करतील हे निश्‍चित. यासाठी संजय शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना ते पुन्हा पक्षात आणून माढ्याच्या रणसंग्रामात निर्णायक लढाई खेळण्याची तयारी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्रात ताकद वाढविण्यासाठी माढ्याची जागा जिंकण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंग बांधला आहे. माढ्यामुळे सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण ठेवता येते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!