पुढील १५ दिवस गांभीर्याने वागण्याची गरज : मुख्यमंत्री

मुंबई दि. २४: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यसचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी, यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, विषाणुच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटस, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता याकडे लक्ष द्यावे, मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्याप्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका

मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

कामाची विभागणी करा

मंत्रालय, मुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावरही कामाची विभागणी केली जावी, यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले.

अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्यात

औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घेतली जावी. जीवनावश्यक वस्तूंची व्याख्या लोकांसाठी आणि यंत्रणेसाठी स्पष्ट करून दिली जावी

राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा साठा आहे तो पोहोचवण्याची व्यवस्था उभी करावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!