पोटनिवडणूक : पंढरपूर व मंगळवेढ्याचा मूड जाणून घेण्यासाठी अजितदादा व जयंत पाटील रविवारी पंढरीत

पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता राजकीय हालचालींना वेग आला असून इतके दिवस मुंबईत याची चाचपणी होत होती, आता प्रत्यक्षात पंढरपूरला राजकीय वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरू होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार चाचपणीसाठी व दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रविवार (21 मार्च) रोजी पंढरपूर दौर्‍यावर येत आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही उमेदवार ठरविण्यासाठीच्या हालचाली तेज झाल्या आहेत.

17 एप्रिल रोजी होणार्‍या या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 23 मार्च रोजी सुरू होत असून ती 30 तारखेपर्यंत चालणार आहे. यामुळे 23 मार्चच्या आसपासच उमेदवारी जाहीर केल्या जातील असे दिसत आहे. ही पोटनिवडणूक असली तरी चुरस मोठी दिसत आहे. दरम्यान ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. कै. भारत भालके हे 2019 ला राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले होते. यामुळे येथे हा पक्षच येथे आपला उमेदवार देणार हे निश्‍चित आहे. दरम्यान येथे पदाधिकारी निवडीमुळे मध्यंतरी पक्षात गोंधळ निर्माण झाला होता मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत काही पदाधिकारी तसेच नेते यांना बोलावून याबाबत चर्चा केली असल्याचे समजते. आता ते जिल्ह्यात येवून पंढरपूर व मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या पदाधिकारी व नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. येथून पक्षाकडून कै. भारत भालके यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जावी असा मतप्रवाह आहे. जिल्हा राष्ट्रवादीमधील पदाधिकारी याबाबत आग्रही असल्याचे दिसते. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके अथवा त्यांच्या मातोश्री जयश्रीताई भालके यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

आमदार कै. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने भालके कुटुंबाची पाठराखण केली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद देखील भगीरथ भालके यांच्याकडेच सोपविण्यात आले आहे. विठ्ठल परिवारात एकवाक्यता राहावी यासाठी दस्तुरखुद्द खासदार शरद पवार हे प्रयत्नशील आहेत. यामुळेच त्यांनी सध्या भाजपात असलेले मात्र विठ्ठल परिवारातील नेते कल्याणराव काळे यांनाही बरोबर घेतल्याचे चित्र आहे. मात्र मागील महिन्यापासून राष्ट्रवादीत पदाधिकारी बदलण्यावरून तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार यांना पदावरून हटवून विजयसिंह देशमुख यांना पद दिल्यावर राष्ट्रवादीत खूप गोंधळ उडाला होता. आता सध्या वातावरण शांत आहे. मात्र याचवेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक व कै.औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी कारखाना निवडणूक लढविण्याची घोषणा केली तसेच कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत आवाज उठवत साखर आयुक्तांनाही पत्र लिहिले.

कै. भारत भालके यांच्यानंतर विठ्ठल परिवाराचे नेतृत्व हे भगीरथ भालके यांच्याकडे येत असल्याचे चित्र आहे. आता विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळाली व ते आमदार झाले तर त्यांचे नियंत्रण पुन्हा या भागावर प्रस्थापित होणार हे निश्‍चित आहे. यामुळे सहाजिकच त्यांना थोडाफार विरोध सहन करावा लागत आहे. यासाठी कारखान्याची आर्थिक स्थितीचा मुद्दा वेगाने पुढे आणला जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हे भालके यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चाचपणी होत असताना ज्याप्रमाणे पंढरपूर भागाचा जसा विचार केला जात आहे तसा मंगळवेढ्याचा ही होत आहे. संपूर्ण तालुका हा या मतदारसंघात जोडला गेला आहे. यामुळे रविवारी अजित पवार व जयंत पाटील हे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतील असे दिसत आहे. येथील उमेदवारीची घोषणा पुढील दोन ते तीन दिवसात घेतला जाईल. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा होणार हे निश्‍चित आहे.

भारतीय जनता पक्ष या पोटनिवडणुकीत कोणाच्या पाठीशी आपली ताकद लावणे हे पाहणे औत्सुक्याचे आहे. येथील उमेदवार ठरविण्यासाठी सध्या मुंबईसह सोलापूरपर्यंत चाचपणी सुरू आहे. पोटनिवडणुक लढविण्यासाठी अनेक राजकीय नेते येथे उत्सुक आहेत यापैकी कोणा एका मातब्बराला भाजपा आपल्या बाजूला वळवून उमेदवारी देवू शकेल असे चित्र आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी मंगळवेढ्याचे उद्योजक समाधान आवताडे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे, उद्योजक अभिजित पाटील यांनीची असल्याचे दिसत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!