प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा 6 नोव्हेंबरपासून , सोलापूर विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर
सोलापूर, दि. 31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.
यासंदर्भात परीक्षा विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासंदर्भाची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रथम वर्ष बॅकलॉगच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा तसेच विधी अभ्यासक्रमाच्या एलएलबी सत्र 1 व 2, बी ए एल एल बी सत्र 1 ते 6 तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमात एफई व एसई (CBCS) भाग 1 व 2, टीई (CGPA) भाग 1 व 2 च्या तसेच बीटेक व आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सत्र 1 ते 6 च्या परीक्षा या दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजीपासून सुरू न होता, त्या दि. 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होतील, याची सर्वानी नोंद घ्यावी.
ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पोर्टलवरून ही परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.