बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या बुधवारी भूमिपूजन

*सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक करण्याचा राज्य शासनाचा निर्धार*
– *उद्योगमंत्री सुभाष देसाई*

मुंबई, दि. 30 : सर्वांना अभिमान वाटेल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उंचीला साजेसं असे स्मारक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून उद्या दि.31 मार्च रोजी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, सायंकाळी साडे पाच वाजता महापौर निवास, दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजुस तर दुसऱ्या बाजुस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तु उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
००००
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!