मनसेच्या रुग्णवाहिकेचे मोडनिंब येथे लोकार्पण ,एकाच वेळी दोन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची सोय

पंढरपूर – कोरोना संसर्गाच्या या काळामध्ये नागरिकांना रुग्णवाहिका मिळत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या वतीने माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोककल्याणासाठी ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान मनसे कोविड काळात जनतेच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. पंढरपूरला सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या पुढाकाराने पल्स कोविड रूग्णालय सुरु करण्यात आले आहे तर बार्शीत फिरते कोविड सेंटर संकल्पना राबविण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढतच आहे. अशा परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी आवश्यक ती वाहतूक व्यवस्था तत्काळ मिळत नाही. शासनाच्या व इतर रुग्णवाहिका देखील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडतात. परिणामी सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी रुग्णांना ऑक्सिजन सुविधेसह रुग्णालयात पोहोच करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रुग्णवाहिका तयार करण्यात आली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेमध्ये एकाच वेळेस दोन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठासह रुग्णालयापर्यंत पोहोच करता येऊ शकते. याच रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मोडनिंब येथे संपन्न झाला.

प्रसंगी दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले , सर्वसामान्यांच्या हिताचा विचार आजपर्यंत मनसे काम करत आली आहे. म्हणूनच आमचे नेते अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुठल्याही प्रकारची धूमधाम न करता लोकांच्या हितासाठी रुग्णवाहिका यापुढे सोलापूर जिल्ह्यात कार्यरत राहील. केवळ लोकहित जोपासणे. अशी राज साहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण ग्रामीण भागातील मनसैनिक पाळतो. त्याचाच भाग म्हणून रुग्णवाहिका यापुढे कार्यरत राहील.

यावेळी मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे , पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, मोडनिंबचे उपसरपंच दत्ता बापू सुर्वे, सिद्धेवाडीचे उपसरपंच दाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे,सोमनाथ माळी सदाशिव पाटोळे,प्रवीण खडके, राजू निंबाळकर,अजित खडके, महादेव मांढरे, राहूल सुर्वे, किरण खडके, निखिल गिड्डे, फिरोज मुजावर, दीपक गिड्डे उपस्थित होते.

798 thoughts on “मनसेच्या रुग्णवाहिकेचे मोडनिंब येथे लोकार्पण ,एकाच वेळी दोन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची सोय