महाराष्ट्रात महिला आमदार केवळ वीस आणि खासदार सहा

महिला दिन विशेष

धनश्री आराध्ये, संपादिका

सर्वप्रथम महिला दिनाच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा… आज हा दिवस जेंव्हा साजरा होत आहे तेंव्हा देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के मतदार असणार्‍या महिलांची ताकद ही पुरूषांच्या बरोबरीने असताना ही खेदाने सांगाावे वाटते की संसदेत 2014 मध्ये केवळ बारा टक्के महिला निवडून गेल्या होत्या तर महाराष्ट्राच्या विधानसभेत वीस आमदार आहेत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याने देशाला महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे समाजसुधारक दिले. सावित्रीमाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचले म्हणूनच आज महाराष्ट्र सर्वात अग्रेसर आहे. येथील महिलांनी स्वातंत्र्यलढ्यात व नंतर देशाच्या उभारणीत आपले योगदान दिले आहे. परंतु विधानसभा व लोकसभेत येथील महिलांचे प्रतिनिधीत्व अगदी नगण्य जाणवते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत यापैकी केवळ सहा ठिकाणी महिला खासदार आहेत. तर 288 विधानसभेच्या जागा असताना केवळ 20 आमदार महिला आहेत, हे ही वास्तव आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने आज या 50 टक्के नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या असोत की महानगरपालिकात महिलाराज आले आहे. याच धर्तीवर देशाच्या संसदेत व राज्याच्या विधानसभेत ही महिला सदस्यांची संख्या ही वाढली पाहिजे.
राज्यात विधानसभेच्या 288 जागा असून 2014 मध्ये 83 महिलांनी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी दाखल केली होती मात्र केवळ वीस जणीच विधानसभेत जावू शकल्या आहेत. त्यावेळी सर्वाधिक महिला उमेदवार दिले होते ते काँगे्रस पक्षाने 27, या पाठोपाठ राष्ट्रवादीने 20, भाजपाने 18, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 11 तर शिवसेनेने 7.
सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ आता संपत आला असून सतराव्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. या मावळत्या लोकसभेत सध्या देशभरातील एकूण 543 खासदारांपैकी 66 महिला आहेत. पन्नास टक्के महिला लोकसंख्या असताना ही केवळ 12 टक्के महिला खासदार आहेत ही चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे. महाराष्ट्रात एकूण 48 जागा असून यापैकी सहा खासदार या महिला आहेत.
आज सर्वच क्षेेत्रात महिलांचा दबदबा असून सुरक्षा दलांमध्ये ही महिलांनी मानाचे स्थान मिळविले आहे. तीन ही सशस्त्र सेनांमध्ये स्त्रीशक्ती दिसून येते. लोकसभेच्या सभापती, देशाच्या संरक्षण व विदेश मंत्रालयाचा पदभार आज महिला सांभाळत आहेत. मुळात स्व. इंदिरा गांधीच्या रूपाने सर्वाधिक काळ महिला पंतप्रधानाने हा देश सांभाळला आहे. असे असताना ही लोकसभेत महिला खासदारांची संख्या ही खूप कमी असल्याचे दिसून येते. 16 व्या लोकसभेसाठी 2014 ला जी निवडणूक झाली यात आजवरच्या निवडणुकांमधील सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या. त्यांची संख्या आहे 66.
देशामध्ये 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश असताना 19 राज्यांमध्येच महिला खासदार विजयी होवू शकल्या आहेत. उर्वरित राज्यात एक ही महिला खासदार नाही. सोळाव्या लोकसभेला सर्वाधिक महिला खासदार उत्तर प्रदेशातून 14 विजयी झाल्या आहेत तर त्या पाठोपाठ पश्‍चिम बंगाल राज्याचा नंबर लागतो. येथे 13 महिला खासदार आहेत. यात ही सर्वाधिक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगे्रस पक्षाच्या महिला खासदार आहेत त्यांची संख्या 12 इतकी आहे.
यानंतर क्रमांक लागतो तो महाराष्ट्राचा येथे एकूण लोकसभेच्या जागा 48 असून यापैकी सहा महिला खासदार आहेत. वास्तविक पाहता देशातील सर्वाधिक पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. येेथेच स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला गेला आहे. सर्वाधिक प्रगतिपथावरील राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख होत असला तरी महिला खासदारांची संख्या अगदी नगण्य आहे. देशात मध्य प्रदेश व गुजरातमधून प्रत्येकी पाच महिला खासदार आहे तर तामिळनाडूतून चार महिला खासदार विजयी झाल्या होत्या. ओडिसा व बिहार मधून प्रत्येकी दोन तर चंदीगड, छत्तीसगड, केरळ, दिल्ली, कर्नाटक,पंजाब, तेलंगाणा, राजस्थान व उत्तरखंड राज्यातून प्रत्येकी एक महिला खासदार या लोकसभेत आहे.
सध्याच्या सोळाव्या लोकसभेत ज्या 66 महिला खासदार आहेत यात सर्वाधिक भारतीय जनता पक्षाच्या 32 आहेत तर काँगे्रसच्या केवळ चार महिला खासदार आहेत. तृणमूल काँगे्रेस पक्षाच्या बारा महिला खासदार लोकसभेत आहेत. आता 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून याची आचारसंहिता येत्या चार दिवसात लागू होईल. देशात महिलांची लोकसंख्या पन्नास टक्के असताना ही संसदेत केवळ 12 टक्के महिलाच खासदार होतात ही स्थिती आता बदलणे आवश्यक आहे.

 

1,044 thoughts on “महाराष्ट्रात महिला आमदार केवळ वीस आणि खासदार सहा