माढा-सोलापूर मतदारसंघ हॉटस्पॉट, देशाचे लक्ष

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्याकडे सार्‍या देशाचे लक्ष असून येथील माढा व सोलापूर या मतदारसंघामध्ये काँगे्रस आघाडीचे दिग्गज नेते आपले नशीब आजमावत आहेत. पंतप्रधानपदाचे स्वप्न उराशी बाळगून यंदा तरी चमत्कार होईल असा विश्‍वास असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची पुन्हा माढ्यात एंट्री होत आहे तर मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर मतदारसंघातील काँगे्रसचे उमेदवार असणार आहेत.
2009 नंतर हा पुन्हा दहा वर्षांनी या दोन्ही मतदारसंघावर देशभराचे लक्ष लागले आहे. 2009 मध्ये पवार व शिंदे या जोडीने आपआपले मतदारसंघ जिंकले होते व देशाच्या राजकारणात ही महत्वाची पदे सांभाळली होती. त्यावेळी ही शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दे पुढे आला होता. मात्र निवडणूक निकालानंतर काँगे्रस पक्षाने चांगल्या जागा जिंकल्या व याच पक्षाचा पंतप्रधान संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) ने निवडला व पंतप्रधानपदी पुनःश्‍च मनमोहनसिंह यांची नियुक्ती झाली होती. 2009 च्या निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांचे केंद्र सरकारमधील वजन वाढले होते. याच काळात त्यांच्याकडे देशाचे उर्जा व नंतर गृहमंत्रीपद आले. प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडीनंतर शिंदे यांना लोकसभेत सभागृहनेते पद बहाल करण्यात आले होते. सभागृहनेतेपद हे सहसा पंतप्रधानांकडे असते मात्र मनमोहनसिंह हे राज्यसभेचे सदस्य असल्याने मुखर्जी यांच्यानंतर शिंदे यांना हा बहुमान मिळाला होता.
सुशीलकुमार शिंदे यांचे काँगे्रसमधील वजन जास्त असून त्यांनी देशपातळीवर अनेक महत्वाची पदे सांभाळली आहेत. 1974-1992 पर्यंत त्यांनी विधानसभेचे सदस्य राहिले आहेत व अनेक विभागाचे मंत्रीपद भुषविले. 1992 ला पहिल्यांदा राज्यसभेवर नियुक्त झाले, ते 12 व्या व 13 व्या लोकसभेचे सदस्य राहिले आहेत, 2004 मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद बनले, यानंतर दोन वर्षे ते आंध्रप्रदेशाचे राज्यपाल होते, 2006 मध्ये पुन्हा राज्यसभेवर त्यांना नियुक्त करून केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. 2002 मध्ये त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली होती परंतु त्यांना भैरवसिंह शेखावत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
अनेक विभागातील राज्यातील मंत्रीपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल असा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्याला मोदी लाटेत 2014 मध्ये सोलापूर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. आता 2019 पुन्हा ते लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यांचे दौरे ही होत आहेत. यामुळे सहाजिकच देशभरातील माध्यमांचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे.
माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा उभे राहणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे. त्यांनी येथे आता व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. 2019 ला कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही व लहान लहान राजकीय पक्षांना महत्व प्राप्त होवून पंतप्रधानपद मिळू शकेल असा पवार समर्थकांचा दावा आहे. यामुळे 2009 प्रमाणे यंदा ही शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. पवार यांनी लोकसभेतून निवडून जावे असा अनेकांचा आग्रह आहे. 2014 मध्ये शरद पवार यांनी आपण आता लोकसभा लढविणार नाही अशी घोषणा करीत राज्यसभेचा मार्ग स्वीकारला होता. मात्र 2019 ला आता त्यांचा सूर बदलला आहे.
शरद पवार हे देशपातळीवर अत्यंत हुशार नेते म्हणून प्रसिध्द आहेत. सर्वच पक्षांशी त्यांचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. तिसर्‍या आघाडीच्या व्यासपीठावर जाणार्‍या पवारांचा सल्ला काँग्रेसचे नेते ही घेत असतात. त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, व त्यांनी ही इच्छा कधी लपवून ही ठेवलेली नाही. पवार यांच्याकडे देशपातळीवर सर्वच प्रसार माध्यमांचे कायम लक्ष असते. गेल्या पाच दशकाहून अधिक काळ ते राज्य व देशाच्या राजकारणात आहेत. 1967 ला पहिल्यांदा ते आमदार झाले तेंव्हा पासून सतत विधानसभा व नंतर लोकसभेत विजयी झाले आहेत. सर्व निवडणुका त्यांनी जिंकल्याच आहेत. 2014 पूर्वी त्यांनी राज्यसभेत जाणे पसंत केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षण व कृषी मंत्रालयासारख्या महत्वाच्या विभागांची जबाबदारी पेलली आहे. पवार हे केवळ राजकारणातच गाजत आहेत असे नाही तर क्रीडा क्षेत्रात ही त्यांनी जोरदार कामगिरी केलेली आहे. ते इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष राहिले आहेत. तत्पूर्वी त्यांनी याच संस्थेचे उपाध्यक्षपद ही भुषविले आहे. ते बीसीसीआयचे तीन वर्षे अध्यक्ष होते. याच बरोबर त्यांनी, कब्बडी, खो-खो, ऑलिंपिक असोशिएशनमध्ये ही काम पाहिले आहे.
देशाच्या राजकारणात अत्यंत मुरब्बी म्हणून प्रसिध्द असणार्‍या पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व आता त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याच बरोबर त्यांचे काँगे्रसमधील सहकारी काँगे्रसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे देखील शेजारच्याच सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याने या दोघांना एकमेकाचे सहाय्य होणार आहे. शिंदे व पवार यांचा दोस्ताना कायम आहे. 2009 मध्ये दोघे ही याच मतदारसंघातून लढले आणि विजयी झाले होते. 2014 नंतर परिस्थिती बदलली आहे. देशात भारतीय जनता पक्षाने चांगले बस्तान बसविले आहे. हा पक्ष सोलापूर व माढ्यात शिंदे व पवार यांच्यासमोर जबर आव्हानं उभे करणार हे निश्‍चित आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!