माढ्याचा तिढा, राष्ट्रवादीची आज पुण्यात तर भाजपाची उद्या मुंबईत खलबतं

माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादीमधूनच सुरू झाला असल्याचे वृत्त असून या मतदारसंघातून पक्षाध्यक्ष शरद पवार हे येथून लढविण्याच्या मनःस्थितीत नाहीत असे कळते. पुण्यातील बारामती होस्टलमध्ये याबाबत सोमवारी सकाळपासूनच बैठका होत आहेत. ज्यास दस्तुरखुद्द पवार साहेब उपस्थित आहेत. यासाठी या मतदारसंघातील पक्षाचे नेते व आमदार यांना ही आमंत्रित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे माढा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील पक्षाचे नेते व महाआघाडीचे प्रवर्तक जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व आमदार प्रशांत परिचारक यांना मंगळवारी मुंबईत बोलाविले असल्याचे समजते.
माढा मतदारसंघ हा 2009 ला निर्मितीपासूनच हॉटस्पॉट बनला असून पहिल्यांदा येथून शरद पवार लढले व विजयी झाले. 2014 ला खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली व त्यांनी मोदी लाटेत विजय मिळविला. आता 2019 ला अचानकच येथून सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीने अगोदर पुढे केले व नंतर शरद पवार यांचे नाव येथून जाहीर झाले. पवार यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. परंतु गेले काही दिवस या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वैचारिक घुसळण होत आहे. मतमतांतर पुढे येत आहेत. यातच पुलवामा घटनेनंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता वाढली आहे. हे पाहता भाजपाला टक्कर देण्यासाठी शरद पवार यांना एकाच मतदारसंघात अडकून पडणे शक्य नसल्याने कदाचित त्यांनी माढ्यातून पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला असावा असे दिसत आहे.
याबाबत अधिकृत कोणतीच घोषणा झालेली नाही. पुण्यात बैठका होत आहेत. यावरून अंदाज बांधले जात आहेत. आता लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ येत असून तत्पूर्वी पक्षातील सर्व नाराजी दूर करून उमेदवारांची नावे पक्षाला जाहीर करायची असल्याने याबाबत काही तासात निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाची विजयसिंह मोहिते पाटील यांनी बांधणी केली आहे. नुकत्याच झालेल्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही या मतदारसंघात दौरे करून मोर्चेबांधणी केली होती.
मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीमधील काहींचा विरोध असला तरी त्यांच्याइतकी या मतदारसंघाची माहिती ही कोणाला नाही. 2009 ला शरद पवार निवडणूक रिंगणात असताना प्रचार प्रमुख म्हणून मोहिते पाटील हेच काम पाहात होते तर 2014 ते विजयी झाले आहेत. पाच वर्षात अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे सर्वच पक्षात मित्र आहेत. याचा फायदा त्यांना निवडणुकीत होवू शकतो. यामुळेच पवार यांनी पुन्हा विजयदादांचे नाव पुढे केले असावे अशी शक्यता आहे.
दरम्यान राष्ट्रवादीमधील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नसताना भाजपाने ही आपला उमेदवार येथे जाहीर केलेला नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांचे या मतदारसंघात सतत दौरे होत असून पक्ष कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या बैठका ते सतत घेत आहेत. पवार हे विरोधी उमेदवार समजून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशमुख हे भाजपाचे वरिष्ठ मंत्री असून जिल्ह्याच्या राजकारणात मात्र त्यांचे व भाजपा सहयोगी महाआघाडीतील नेत्यांचे फारसे पटत नाही. आमदार प्रशांत परिचारक व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे आहेत. मात्र माढ्याची जबाबदारी सुभाष देशमुख यांच्यावर असल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीच्या नेत्यांबरोबर तातडीची बैठक मुंबईत बोलाविल्याचे समजते. येथे ते शिंदे व परिचारक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या राज्यभरातील मतदारसंघाच्या बैठका होत आहेत. आजच अहमदनगरच्या जागेबाबत मुंबईत चर्चा झाली आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार ? यावर भाजपा आपला उमेदवाद रिंगणात उतरवेल असे दिसत आहे. मोहिते पाटील यांचे नाव पवार यांनी फायनल केल्यास माढ्यातून कदाचित संजय शिंदे यांना देखील उतरविण्याची तयारी होवू शकते असे अनेकांचे मतं आहे, यावरच विचार करण्यासाठी फडणवीस यांनी मंगळवारी बैठक बोलाविली असल्याचे समजते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!