नातवासाठी आजोबांचा त्याग, शरदनीतीमुळे पुन्हा माढा चर्चेत

प्रत्येक आजोबाला आपले बालपण, तरूणपण हे नातवामध्ये दिसत असते व यामुळेच तो त्यांचा लाडका असतो. हे सर्वच घरातील वास्तव आहे. यास मोठी राजकीय घराणी ही अपवाद नाहीत. याचे एक उदाहरण आजच देशासमोर आले असून राजकारणात अत्यंत मुरब्बी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रवादीच्या संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ही नातू पार्थ अजित पवार याच्या मावळच्या लोकसभा उमेदवारीसाठी स्वतःची माढ्याची उमेदवारी मागे घेतली आहे. याबाबत दस्तुरखुद्द पवार यांनीच खुलासा केला आहे.
मुळात शरद पवार यांनी 2009 ला माढ्यातून निवडणूक लढविली व विक्रमी मतांनी जिंकली देखील. 2014 ला त्यांनी राज्यसभेत जाणे पसंत केले व पुढील काळात लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु 2019 उजाडता उजाडता पवार यांनी पुन्हा माढ्यातूनच लोकसभेच्या मैदानातून उतरण्याचे संकेत दिले. त्यांना पक्षातील लोकांनी खूप आग्रह केला. याच काळात त्यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार बांधणी केली व तेथूनच त्यांना उमेदवारी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची मागणी ही जोर धरू लागली.
सुरूवातीला शरद पवार यांनी पार्थ पवार हा मावळमधून उभारणार नाही असे सांगितले. परंतु जस जशी निवडणूक जवळ येवू लागली तसा सूर बदलत गेला आणि आज सोमवारी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पार्थ हा मावळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल असे जाहीर केले. पण त्याचे वेळी त्यांनी आपण माढ्यातून लढणार नाही असे जाहीर करून टाकले.
पवार हे सोलापूर व सातारा जिल्ह्यात विभागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहिले असते तर पवार घरातील तीन उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात दिसले असते. माढ्यातून शरदराव, बारामतीमधून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे व शेजारच्या मावळमधून पार्थ अजित पवार. एकाच घरातील तीन जण तीन मतदारसंघात उभे राहिले तर राज्य व देशभर हा टीकेचा विषय होवू शकतो. कारण सध्याच घराणेशाहीवर खूप काही बोलले जात आहे.
शरद पवार यांनी आपल्या नातवासाठी माढ्याची आपली जागा सोडून दिली आहे. येथून आता ते कोणाला उमेदवारी देणार हे लवकरच कळेल. पवार यांनी माढ्यातून लढण्याची पक्की तयारी केली होती. यासाठी त्यांनी सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस व फलटण तालुक्यांचा दौरा केला होता. येथे पक्षाअंतर्गत असणारी गटबाजी कमी करण्याचे प्रयत्न केले होते. पवार हे निवडणूक रिंगणात असल्यावर येथे सर्व नेते गटतट सोडून त्यांच्या विजयासाठी काम करतात असा अनुभव आहे. अन्य पक्षातील मंडळी ही पवारांना साथ देतात हे दिसून आले आहे.
आता पवार यांनी तरूणांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या दौर्‍यात त्यांचे नातू पार्थ व रोहित पवार हे दिसून आले होते. त्याच वेळी आगामी काळात पवारांची पुढील पिढी सक्रिय राजकारणात उतरणार हे निश्‍चित झाले होते. सोमवारी तर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा लढवूनच राजकारणाची सुरूवात केली होती. आता त्यांचे चिरंजीव पार्थ पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेची जागा लढविणार आहेत. या मतदारसंघावर त्यांनी गेल्या काही काळापासून लक्ष केंद्रित केले होते व तेथे तरूण कार्यकर्त्यांची फळी ही निर्माण केली आहे.
खासदार शरद पवार यांच्यासाठी निवडणूक ही नवीन नाही. त्यांनी आजवर विधानसभा व लोकसभेच्या 14 निवडणुका लढविल्या असून त्या सर्व जिंकल्या आहेत. एकदाही ते पराभूत झालेले नाहीत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!