राजू शेट्टी…. साखर कारखानदारांच्या नेत्यांशी जमली गट्टी

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर साखर कारखानदारांशी सतत भांडणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे तिसर्‍यांदा हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवित असून यंदा त्यांचा दोस्ताना दोन्ही काँगे्रससोबत आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने गुरूवारी पहिली 12 उमेदवारांची यादी जाहीर केली यात हातकणंगले येथून राजू शेट्टी यांचे नाव आहे. आघाडीच्या तडजोडीत शरद पवार यांनी आपल्या कोट्यातून ही जागा स्वाभिमानीला देवू केले असल्याचे दिसत आहे. पवार हे साखर कारखानदारांचे नेते असल्याने त्यांच्यावर सतत आरोपांच्या फैरी झाडणार्‍या शेट्टी यांना 2019 च्या लोकसभेला त्यांच्याशी मैत्री करावी लागल्याचे चित्र आहे.
खासदार राजू शेट्टी हे तिसर्‍या वेळेस हातकणंगले मधून नशीब आजमावित आहेत. 2009 ला त्यांचा सामना राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्याबरोबर झाला होता. यात शेट्टी विजयी झाले. 2014 ला दोन्ही काँगे्रस पक्षांनी शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी येथून अनुभवी नेते कलप्पा आवाडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडली. त्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाच्या पाठिंब्यावर लढलेल्या खासदार शेट्टी यांनी आवाडे यांचा पावणे दोन लाख मतांनी पराभव केला होता व दुसर्‍यांना तेथून विजय मिळविला.
आता तिसर्‍यांना शेट्टी हातकणंगलेमधून उभे राहत असून त्यांना राष्ट्रवादी व काँगे्रसचा पाठिंबा आहे. वास्तविक पाहता शेट्टी व राष्ट्रवादी काँगे्रस यांचे सूत यापूर्वी कधी जुळलेले दिसले नाही. आघाडी सरकारच्या काळात शेट्टी व खोत हे दोघे ही ऊस दराच्या आंदोलनाच्या वेळी दोन्ही काँगे्रसवर खूप टीका करत. त्यातल्या त्यात खासदर शरद पवार हे त्यांचे नेहमीच टार्गेट असत. ऊसदराच्या आंदोलनावेळी शेट्टी यांनी पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा ही काढली होती. पवार हे साखर कारखानदारांचे नेते असल्याने त्यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेहमीच रोष पाहावयास मिळाला.
सोलापूर जिल्ह्यात शेट्टी यांनी काम सुरू केल्यानंतर पहिल्यांदा 2009 मध्ये भारत भालके यांना पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारी दिली होती. भालके विजयी झाले व त्यांनी काँगे्रसला पाठिंबा दिला. यानंतर 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक व करमाळ्यात संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी साखर कारखानदार नेत्यांना विधानसभेला सहकार्य का करता ? असा जाब विचारत स्वाभिमानीमधील काही जणांनी संघटनेचा त्याग करून नवीन संघटना स्थापन केली. विधानसभेनंतर काही दिवसातच परिचारक व शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून स्वतःला दूर केले. त्यावेळी चिडलेल्या खासदार शेट्टी यांनी यापुढील काळात साखर कारखानदारांना उमेदवारी अथवा पाठिंबा देणार नाही अशी घोषणा केली.
दरम्यानच्या काळात राज्यात स्वाभिमानीत शेट्टी व खोत असे दोन गट पडले व खोत यांना भाजपाने मंत्रिपद दिले. यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन रयत क्रांती संघटना काढली व रागावलेल्या शेट्टींनी भाजपाशी असणारी मैत्री तोडली व तेंव्हापासून ते दोन्ही काँगे्रसच्या जवळ येण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी दोस्ताना वाढविला होता.
आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांची भूमिका काय असणार ? याबाबत सतत चर्चा सुरू होती. स्वाभिमानी पक्षाने आघाडीकडे वर्धा, माढा, बुलढाणा यासह अन्य जागा मागितल्या होत्या. माढ्यातून शरद पवार यांची उमेदवारी ठरल्यानंतर याच मतदारसंघातून शेट्टी यांनी उभे राहावे असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वेळापूर येथील परिषदेत झाला होता.
राज्यात साखर कारखानदारीवर दोन्ही काँगे्रसचे वर्चस्व असून प्रतिवर्षी ऊसदरासाठी शेतकरी संघटनांना कारखानदारांशी भांडावे लागते तसेच आंदोलन करावी लागतात.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!