शिंदे कारखान्याच्या करकंब युनिट 2 ची गाळप क्षमता वाढणार, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सोय

पंढरपूर- माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व करकंब येथील युनिट 2 मध्ये मिळून यंदाच्या हंगामात 19 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून पुढील वर्षी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे तर करकंब येथील कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता चार हजार मे. टनापर्यंत वाढविण्यात येणार आहे. दरम्यान करकंब युनिट नं. 2 मुळे पंढरपूर भागातील उसाची सोय झाली असून यंदा या कारखान्यात चार लाख टनाहून अधिक ऊस गाळला गेला आहे.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा यशस्वी साखर कारखाना असून तो सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे गाळप करतो. या कारखान्याने पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभेला जोडलेल्या करकंब भागातील विजय शुगर्स हा खासगी साखर कारखाना घेतला असून तो शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोन म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्याने यंदा चार लाख मे. टन ऊस गाळला आहे. पिंपळनेर व करकंब या दोन्ही कारखान्यात मिळून यंदाचे उसाचे गाळप जवळपास 20 लाख मे. टनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

एका बाजूला पंढरपूर तालुक्यातील काही कारखाने आपला गळीत हंगाम क्षमतेनेही करून शकत नसताना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने पंढरपूर तालुक्यात कारखाना घेवून तो यशस्वी चालवून दाखविला आहे. या कारखान्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही आता पर्याय मिळाला आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक साखर कारखाने जिल्ह्यात व बाहेर यशस्वीपणे कार्यरत आहेत. करकंब युनिट दोनची गाळप क्षमता वाढविण्याची घोषणा आमदर शिंदे यांनी नुकतीच केली आहे. बिनविरोध निवडणुकीनंतर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची पुन्हा रविवारी निवड झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. करकंब कारखाना पुढील वर्षीपासून चार हजार मे. टन ऊस रोज गाळप कल अशी व्यवस्था केली जात आहे.

पंढरपूर तालुका हा उसाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. येथे उत्पादन जास्त असल्याने अनेक साखर कारखाने येथील उसावर चालतात. राज्यात अग्रेसर व आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली चालणारा श्रीपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा पंढरपूरच्या उसावरच चालतो. हा कारखाना आदर्श म्हणून ओळखला जातो. याचबरोबर उमेश परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यात काढलेला युटोपियन शुगर्सला पंढरपूर तालुक्यातून ऊस पुरविला जातो. या कारखान्याने पाच लाख मे. टनाचे गाळप करून हंगाम बंद केला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!