शिंदे बंधूच्या गडावर ही पवारांना मोहितेंचाच आधार

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे गुरूवारी माढा तालुक्यातील निमगाव येथे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आले असतानाचे एक बोलके छायाचित्र व्हायरल झाले असून यात पवारांनी चालताना आधारासाठी माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा हात धरल्याचे यात दिसत आहे. २००९ ला पवार पहिल्यांदा माढ्यात आले तेंव्हा ही या जागेसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती तर २०१९ ला पुन्हा पवार साहेबांची एंट्री येथे होत असताना ही या जागेवरील दावेदारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी सोडून दिली व पवारांची साथ करणे पसंत केले आहेे. २००९ ला मोहिते पाटील यांनी पवारांची साथ केली तर २०१९ ला ही रस्ता मोकळा करून दिला आहे. हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण असून दोन जिल्ह्यात विखुरलेला आहे. मोहिते पाटील यांनी २०१४ मध्ये येथूनच मोदी लाटेत विजय मिळविला होता. आता पवारांना २०१९ च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांची मदत लागणारच आहे. शरद पवार हे माढ्यातून पुन्हा निवडणूक लढविणार असे दिसू लागताच मोहिते पाटील यांनीच पवारांचे नाव पुढे रेटले. सांगोल्यात जाहीर मागणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून त्यांनी गुरूवारी माढा तालुक्याचा दौरा केला. निमगाव येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या निवासस्थानी सर्व राष्ट्रवादी नेत्यांची बैठक घेतली व भोजनाचा अस्वाद ही घेतला. भाजपाबरोबर गेल्या चार वर्षापासून काम करणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे देखील यावेळी पवार यांच्या स्वागताला येथे उपस्थित होते. शिंदे बंधू व पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. संजय शिंदे हे जरी भाजपाच्या जवळ गेले असले तरी त्यांनी या काळात पवार कुटुंबाबरोबरचे आपले संबंध आहे तसेच ठेवले आहेत. मध्यंतरी अजित पवार हे राष्ट्रवादीच्या जनआक्रोश यात्रेदरम्यान सोलापूर जिल्ह्यात असता निमगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले होते. आता तर शरद पवार हेच माढा लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. यामुळे सहाजिकच संजय शिंदे यांच्या भूमिकेकडे सार्‍यांचे लक्ष आहे. दोनच दिवसापूर्वी संजय शिंदे यांनी पुण्यात शरद पवार व अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती व याची छायाचित्र आज बरोबर पवारांच्या दौर्‍यादरम्यान प्रसिध्द झाली आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असताना देखील अध्यक्षपदाच्या वेळी संजय शिंदे यांनी भाजपा पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून हे पद मिळविले होते. त्यावेळी मतदान न होता अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले जात होते. आता अनेक समीकरण सुटू लागली आहेत. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी मोहिते पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र त्यांची व्यूहरचना यशस्वी झाली नाही. शिंदे बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजी मारली होती.माढ्याचे शिंदे बंधू व मोहिते पाटील यांच्यात राजकीय चुरस असून गेले अनेक वर्षे त्यांच्यातील सत्तास्पर्धा सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!