शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर , पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

मुंबई- शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात. आता तालुका स्तरावर सुरु होतील. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर 5 रुपये इतका करण्यात आला आहे.

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी 30 रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल.

ही भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात सुरु राहतील.

या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
—–०—–

सार्वजनिक आरोग्य विभाग

*कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी*
*प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता*

कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले. या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली.

· 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला.

· उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

· 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.

· गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.

· आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.

*वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग*

· वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गेल्या काही दिवसात विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक, सुश्रुषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहीत करणे.

· कोरोन विषाणुच्या अनुषंगाने सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत / कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणे.

· कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणे.
—–०—–

(केशरी शिधापत्रिका धारकांबाबतचा निर्णय विभागाकडून प्राप्त होताच पाठविण्यात येईल)
—–०—–

*मंत्रिपरिषदेची बैठक*
*व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे*

आज कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते.

मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲङ अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले

या बैठकीत प्रारंभी कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सुचना केल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे प्राथम्याने करण्यात येईल असे सांगितले. होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा 5.50 लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

*कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती*

· महाराष्ट्रात आजमितीस 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.

· एकूण 17563 सॅम्पल्स तपासले असून 15808 निगेटिव्ह आहेत.

· महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

· मुंबईमध्ये सर्वाधिक 525 रुग्ण असून 34 मृत्यू आहेत. त्या खालोखाल पुणे येथे 131 रुग्ण व 5 मृत्यू तसेच ठाणे विभागात 82 रुग्ण व 5 मृत्यू आहेत.

· महाराष्ट्रातील एकंदर 11 कोटी 19 लाख 66 हजार 637 लोकसंख्येपैकी 868 कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक 10 हजार लोकसंख्येमागे 0.077 असे रुग्ण आहेत.

· आढळलेल्या रुग्णांमध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिला आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये 39.75 टक्के पुरुष आणि 13.25 टक्के महिला आहेत.

· दहाव्या आठवड्यात भारतात 4125 रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत 1 लाख 22 हजार 653, फान्समध्ये 37 हजार 145, जपानमध्ये 1 हजार 693 आणि चीनमध्ये 81 हजार 601 अशी आकडेवारी आहे.

· सध्या राज्यात 3 लाख 2 हजार 795 एन-95 मास्क, 41 हजार 400 पीपीई, 10 हजार 317 आयसोलेशन बेड, 2 हजार 666 आयसीयू बेड आणि 1 हजार 317 व्हेंटिलेटर्स आहेत.

One thought on “शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर , पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

  • March 17, 2023 at 7:06 am
    Permalink

    Hi there! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my previous room mate! He always kept talking about this. I will forward this article to him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!