श्री विठ्ठल मंदिर ३० जून पर्यंत दर्शनासाठी बंदच राहणार

पंढरपूर, दि. १- केंद्र सरकारने लॉकडाऊन ३० जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला तर राज्य शासनाने ही धार्मिक स्थळे ३० जून २०२० पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना केल्याने पंढरपूर चे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर आता भाविकांना दर्शनासाठी ३० जून पर्यंत बंदच राहणार आहे. अशी माहिती मंदिरे समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता १७ मार्च ते ३१ मे पर्यंत लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे दर्शनासाठी बंदच आहे. या काळात केंद्र व राज्य सरकारने ४ वेळा टाळेबंदी जाहीर केली होती. आता लॉकडाऊन ५ पुकारण्यात आला असला तरी यात काही बाबींना सूट देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने देवस्थान ३० जून पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्यात ही कोरोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत.
लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असले तरी श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेतली जात आहे. वारकरी सांप्रदयाचे श्रीं च्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, हे सर्व उपचार तसेच सध्या सुरू असलेली चंदन उटी पूजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात आला आहे, त्याच्या स्वरूपात किंवा त्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता सुरू आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्यात येत असल्याचे मंदिरे समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय समितीने घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी कळविले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!