श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तींवर वज्रलेप करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

पंढरपूर– श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी मंगळवारपासून वज्रलेप प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. आज मूर्तीची स्वच्छता केली जात असून उद्या बुधवारी प्रत्यक्षात वज्रलेपन केले जाणार आहे. दरम्यान या प्रक्रियेविषयी चर्चा करण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष व सल्लागार समितीमधील महाराज मंडळी यांच्यात बैठक होवून यावर संपूर्ण चर्चा झाली.
पुरातत्व विभागाचे अधीक्षक श्रीकांत मिश्रा व त्यांच्या सहकार्‍यांनी पारंपारिक वेषात अर्थात सोवळे परिधान करूनच देवाच्या मूर्तीची पाहणी केली. तसेच रासायनिक लेप देताना देखील हे सर्व अधिकारी व कर्मचारी सोवळे नेसूनच सर्व प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
यापूर्वी ही 1998,2005 व 2012 मध्ये पंढरीत श्री विठ्ठल व रूक्मिणी मूर्तींना वज्रलेप देण्यात आला आहे. दर पाच वर्षांनी ही प्रक्रिय करावी लागते. दरम्यान याबाबत सर्व शासकीय मान्यता घेतल्यानंतर मंगळवारी 23 रोजी या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक तथा रासायनिक तज्ज्ञ श्रीकांत मिश्रा व त्यांच्या चार सहकार्‍यांनी मूर्तीची पाहणी केली आज मूर्ती स्वच्छ करून घेण्यास सुरूवात केली. यापूर्वी लावलेला रासायनिक लेप काढून टाकण्यात आला आहे. बुधवारी प्रत्यक्ष मूर्तींना हे तज्ज्ञ वज्रलेप करणार आहेत. हा वज्रलेप विठ्ठल व रूक्मिणी दोन्ही मूर्तीवर होत असून यामुळे पुढील पाच वर्षे मूर्तीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान सदर लेप देण्यापूर्वी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभामंडप येथे समितीचे सल्लागार सदस्य महाराजांची बैठक पार पडली. यास प्रसाद महाराज अंमळनेरकर, विठ्ठल महाराज वासकर, चैतन्य महाराज देगलूरकर, माधव महाराज शिवणीकर यांच्यासह नगराध्यक्षा साधना भोसले, सदस्या शकुंतला नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. बैठकीत मूर्तीवर करण्यात येणार्‍या वज्रलेपाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यास सल्लागार सदस्यांनी एकमताने मंजुरी दिल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.

आयुर्वेदिक लेप देण्याची मागणी
दरम्यान देवाच्या मूर्तीला रासायनिक लेप देण्यास वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वासकर व प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी विरोध केला आहे. याबाबत मंदिर समितीला निवेदन दिले असून यात मंदिर समितीकडून वज्रलेप देण्यास घाई होत असल्याचा आरोप वीर महाराज यांनी केला आहे. मूर्ती संवर्धन समिती स्थापन करावी तसेच पारंपारिक पध्दतीने आयुर्वेदिक लेपन द्यावे अशी मागणी या महाराज मंडळींनी केली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!