संचारबंदीबाबत प्रशासनाचे लवचिक धोरण स्वागतार्ह , कालावधी कमी केला तर परीक्षार्थींसाठीही सोय
पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत पंढरीत येणार्या भाविकांना रोखण्यासाठी तसेच स्थानिकांची मंदिर व संतपादुका दर्शनाची गर्दी रोखण्यासाठी सुरूवातीला प्रशासनाने तब्बल नऊ दिवस संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर नागरिक व व्यापार्यांमध्ये असणारी नाराजी पाहून लवचिक धोरण स्वीकारत जिल्हा प्रशासनाने तीन स्तरात याची विभागणी करत निर्बंधांचा कालावधी कमी केला आहे.
नव्या आदेशानुसार पंढरपूर शहर व गोपाळपूर येथे 18 ते 24 जुलैपर्यंत तर शहराच्या आजुबाजूला असणार्या तालुक्यातील नऊ गावांमध्ये ज्यात भटुंबरे, शिरढोण, कौठाळी, गादेगाव, लक्ष्मी टाकळी, चिंचोली भोसे, वाखरी, कोर्टी, शेगावदुमाला येथे 22 जुलैपर्यंतच संचारबंदी राहणार आहे. मात्र, 25 जुलैपर्यंत शहरातील प्रदक्षिणा मार्गाच्या आतील भाग जो मंदिर परिसर म्हणून ओळखला जातो तो दुपारपर्यंत बंदच राहणार असल्याचा सुधारित आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी यात्रा प्रतीकात्मक होत असल्याने प्रशासनाने सुरूवातीला 17 ते 25 पर्यंत संचारबंदी जाहीर केली होती. पंढरपूर शहर व तालुक्यातील शहराच्या आजुबाजूच्या दहा गावांचा यात समावेश होता. ल नऊ दिवस संचारबंदीमुळे नागरिकांसह व्यापार्यांनी याला विरोध दर्शविला. तसेच आमदारद्वय प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनं देवून संचारबंदीमध्ये शिथिलता देण्याची मागणी केली होती. या सर्वांची दखल घेत गुरूवारी प्रशासनाने सुधारित आदेश काढला आहे.
सुधारित आदेशानुसार रविवार, 18 जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूर व गोपाळपूर येथे संचारबंदी राहणार आहे. दरम्यान शहरानजीक असणार्या नऊ गावांमध्ये गुरूवारपर्यंत संचारबंदी राहणार आहे. तर मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्ग येथे रविवार, 25 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. चंद्रभागा वाळवंटात स्नानाकरीता येण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदी कमी करण्यात आली असली तरी एसटी तसेच खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रविवार 25 जुलै रोजी दुपारी 4 पर्यंत पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
जीईई परीक्षेसाठी जाणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट दाखवून सोलापूरला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी वाहनाने त्यांना जाण्यास मुभा असेल. संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच मंदिर समितीचे पासधारक यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, पास दिलेले पालखी सोहळे तसेच जीवनावश्यक सेवेतील दुकानदार, आषाढीत पूर्वापार परंपरा व साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुसार परवानगी देण्याचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. तसेच 19 ते 24 पर्यंत मद्य, मांस, मटण विक्री, प्राणी कत्तल यावर बंदी असणार आहे.