सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी करणार : गृहमंत्री

पोलिसांचा गणवेश बदलण्यामागणीचा विचार करू : अनिल देशमुख

मुंबई : पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करू असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील पोलीसदलाचे सक्षमीकरणा करताना करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करतानाच पोलीसांच्या वैयक्तिक आशा-आकांक्षा आणि समस्यांची माहिती घेण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सेवानिवृत्त पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांची बैठक घेतली. गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांच्यासह देशमुख यांनी एस. एम. पठाणिया, ओ. पी. बाली, संजीव दयाळ, प्रवीण दीक्षित, सतीश माथूर, पी. एस. पसरिचा, डी. शिवानंद, डी. एन जाधव या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रधान सचिव सीताराम कुंटे, विनित अग्रवाल, मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेदेखील या बैठकीत उपस्थित होते.
संपूर्ण आयुष्य राज्यातील विविध शहरांत सेवा केलेल्या आणि पोलीस दलाची अगदी तळापासून माहिती आणि अभ्यास असणाऱ्यांना अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते, असे गृह मंत्र्यांनी सांगितले. या वेळी अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या विविध समस्या सांगितल्या. कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा केली. प्रकृती अस्वास्थ किंवा बाहेरगावी असलेल्या अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी लिखित स्वरुपात सूचना पाठविल्या होत्या.
माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांनी सुचविले की, पोलिसांच्या शर्ट आणि पँटसाठी एकच कापड वापरले जाते. ते भारतीय वातावरणाशी सुसंगत नसल्याने बदलण्याची गरज आहे. शर्टच्या खिशात मोबाईल, डायरीही बसत नाही. त्यामुळे युनिफॉर्ममध्ये हाफ जॅकेटचा समावेश करावा. त्याच्या पाठीमागच्या बाजूला युनिटचे नाव लिहावे. पोलीसांना लेदर बुटामुळे आरोपीचा पाठलाग करणे अवघड होते. त्यामुळे काळ्या रंगाचे स्पार्टस बुट द्यावेत.
सुपरकॉप म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांनी पोलिसांवर अतिरिक्त ताण येत असल्याने पोलीसांची ड्युटी आठ तास करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी पोलीस दलातील सर्व रिक्त जागा भरण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची वार्षिक आरोग्य तपासणी व्हावी, पोलीस वसाहतींची देखभाल, दुरुस्ती व्हावी, पोलीस ठाण्याच्या इमारतींची दुरुस्ती आणि सुशोभिकरण करावे, पोलीसांसाठीच्या कुटुंब कल्याण आरोग्य योजनेत हनिर्या, स्लिप डिस्कसारख्या व्याधींचा समावेश करावा, पोलीसांचा फिटनेस अलाऊन्स अडीचशे रुपयांवरून एक हजार रुपये करावा अशी अपेक्षा रिबेरो यांनी व्यक्त केली.
कायद्याच्या चौकटीत प्रत्येक पोलीस युनिटला आवश्यक स्वायत्तता आणि अधिकार द्यावेत अशी अपेक्षा माजी पोलीस महासंचालक अनामी रॉय यांनी व्यक्त केली.
यावर देशमुख म्हणाले, राज्यातील पोलीस दल एक कुटुंब समजून गृह विभाग काम करत आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील ३२ जिल्ह्यांचा दौरा करून पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांशी संवाद साधला. निवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग करून पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी संवाद साधला. संवादाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार असून त्यातून अनेक नवनवीन कल्पना पुढे येतील. त्यातून पोलीस दलाची कार्यक्षमताही वाढेल.

13 thoughts on “सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी करणार : गृहमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!