सोनम वांगचुक यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे – लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने यावर्षी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरीरीने पुरस्कार व प्रसार त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले गुणात्मक बदल यासाठी सोनम वांगचुक यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता होत असून या पार्श्वभूमीवर वांगचुक यांना जाहीर झालेला पुरस्कार औचित्याचा ठरणार आहे.ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यावेळी उपस्थित होते.

दरवर्षी लोकमान्यांच्या पुण्यतिथीदिनी, दि. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरामध्ये होणार्‍या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या गंभीर संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम होणार नाही, मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर योग्य नियोजन करून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल, असे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे 37वे वर्ष आहे. 1983पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यापूर्वी एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन तर मागीलवर्षी बाबा कल्याणी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद करून डॉ. टिळक यांनी सांगितले की, लडाख सीमेवरील अलिकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल, अशी ठाम भूमिका मांडली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग जागतिक पातळीवर दखल घेणारे ठरले. स्थानिक समुदायाचा विकास करण्यासाठी त्यांनी राबविलेले अभिनव उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरले आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना होय! कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुण्यातच वांगचुक यांना प्रत्यक्ष पुरस्कार दिला जाईल. टिळक स्मृती शताब्दीनिमित्त केसरी मराठा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यासह देशभरातील विविध संस्था संघटनांनी अनेक उपक्रम राबवून आधुनिक भारताच्या या शिल्पकाराला आदरांजली अर्पण केली. लोकमान्य टिळकांवरील संग्राह्य साहित्य तसेच टिळकांच्या सर्व लेखनाचे ‘समग्र टिळक’ हे आठ खंड वाचक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात आले. आठ हजार रुपये किंमतीचा ‘समग्र टिळक’ संच सवलतीत अवघ्या साडेपाच हजार रुपयांमध्ये मिळेल. टिळकांवरील इंग्रजीतील बारा पुस्तकांचा संच तसेच मराठीतील 17 विविध पुस्तके देखील केसरी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यावतीने सवलतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार्‍या सोनम वांगचुक यांना अभिनव कल्पना आणि प्रयोगांसाठी जगभर ओळखले जाते. रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी लडाखमध्ये लेह जिल्ह्यात झाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी मिळवली. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1988मध्ये त्यांनी लडाखमधील सरकारी शाळांमधील व्यवस्थेत गुणात्मक बदल करण्याचे उद्दिष्ट ठेवून स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (सेकमॉल) ही चळवळ सुरु केली. या माध्यमातून वांगचुक यांनी सरकार, ग्रामीण समुदाय आणि नागरी समाज यांच्या सहकार्यातून शासकीय शाळांच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी पुढाकार घेतला. सरकार, ग्रामीण समुदाय, नागरी समाज या तीन घटकांच्या समन्वयातून लडाखमध्ये ग्राम शिक्षण समित्यांची स्थापना झाली आणि या समित्यांकडे शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण आणि संवादी रीतीने अध्यापन व्हावे यासाठी यामार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर लडाखची स्थानिक ओळख अधोरेखित करण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन आणि प्रकाशन करण्यात आले. या बदलातून लडाखमधील दहावी परीक्षेतील उत्तीर्णतेचे प्रमाण अवघ्या सात वर्षांत पाच टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांवर पोहोचले. आता हे प्रमाण तब्बल पंच्याहत्तर टक्के इतके आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचुक यांनी लेहजवळ सुरू केलेले सेकमॉल पर्यायी शाळा केंद्र संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे ठरले. या विशेष शाळेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विशेष शाळेतून मिळणार्‍या पाठबळ आणि प्रोत्साहनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना स्वतःमधील कौशल्य सिद्ध करता आले. तेथील निर्मितीशील वातावरणामुळे ही कथित अपयशी मुले आपापल्या क्षेत्रात चमकू लागली. यातील अनेकांनी उद्योजक, चित्रपट निर्माता, राजकारणी, शिक्षक म्हणून जागतिक पातळीवर ख्याती मिळविली आहे.
सेकमॉल शाळेत सोनम वांगचुक यांनी नवनिर्मितीचे धडे देत अध्यापन केले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी मातीचा वापर करून अतिशय कमी खर्चात वैशिष्ट्यपूर्ण इमारत उभी केली. सौर उर्जेचा वापर ही या इमारतीची ओळख आहे. लडाखमधील हिवाळ्यात बाहेर उणे 15 सेल्सिअस तपमान असताना या इमारतीतील तपमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहते.
हवामानातील बदल आणि वेगाने वितळणारे हिमनग यामुळे लडाखमधील उंच पर्वतीय भागातील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत होती. ती सोडविण्यासाठी वांगचुक यांनी कृत्रिम हिमनगांची निर्मिती केली. त्यांनी तयार केलेल्या ‘आईस स्तूप’द्वारे हिवाळ्यात वाया जाणारे पाणी प्रचंड आकाराच्या बर्फाच्या रुपात साठविणे शक्य झाले. उन्हाळ्यात ते वितळून तेथील शेतकर्‍यांची पाण्याची गरज भागविली जाते.
आशियाचे नोबेल ही ओळख असणार्‍या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने 2018मध्ये सोनम वांगचुक यांचा गौरव करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर सरकारने 1996मध्ये राज्यपाल पदक देऊन त्यांना सन्मानित केले. सामाजिक उद्यमशीलतेसाठी 2017मध्ये त्यांना ‘दि जीक्यू मेन ऑफ दि इयर’ पुरस्कार तर अमेरिकेत 2016मध्ये दि रोलेक्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युनेस्कोच्या अध्यासनातर्फे ‘दि टेरा अ‍ॅवॉर्ड’ त्यांना देण्यात आले. सँक्च्युरी एशिया मॅगझीन, दि विक यांनीही वांगचुक यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार दिले. सीएनएन आयबीएन वाहिनीचा ‘रिअल हिरोज्’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

One thought on “सोनम वांगचुक यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

  • March 17, 2023 at 10:49 am
    Permalink

    You actually make it seem really easy with your presentation but I find this matter to be actually one thing which I think I’d by no means understand. It sort of feels too complicated and very broad for me. I’m looking ahead in your next submit, I?¦ll try to get the dangle of it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!