सोलापुरात कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न करा: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

सोलापूर, दि. 11 – सोलापूर शहरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी करण्याचा प्रयत्न करा अशा सूचना जिल्हा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.

सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री श्री.भरणे यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, गजानन गुरव, अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करा. यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यातील कालावधी कसा कमी करता येईल यावर भर द्या. राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. दिलीप कदम यांनी नुकतीच सोलापूर शहराला भेट दिली आहे. त्यांनी सोलापुरातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनावर अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राज्याच्या पथकातील विशेष तज्ञ डॉक्टर बोरसे यांना संपर्क करून मृत्यूदर कमी करण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करा. इतर जिल्ह्यात काय उपचार सुरू आहेत. तेथे काही नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविल्या जात आहेत का, याची माहिती घ्या.

बैठकीत मद्य विक्री सुरू करण्याबाबत चर्चा झाली. यावर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित विचार करून त्याबाबत निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या कंपन्या आणि वित्तीय संस्थाविरुद्ध कारवाई करावी, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती.

• मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे, पत्रकारांनी याला जास्त प्रसिद्धी द्यावी.

• जनमानसात कोविड-19 बाबत सकारात्मक संदेश जाण्यासाठी सर्वच माध्यमांचे योगदान महत्वाचे.

• जिल्ह्यात कोविड-19 तपासणी चाचण्या वाढविण्यावर भर, इतर ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर, सल्लागार जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन सूचना करणार.

• लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रो फायनान्स, फायनान्सची वसुली करता येणार नाही.

• घरगुती, कृषी, व्यावसायिक वीज बील न भरल्यास वीज कपात अथवा वीज खंडित करता कामा नये.

• शहरात तपासणी कीटचे प्रमाण वाढविणार. एका तासात रिपोर्ट येईल, अशी व्यवस्था आठवडाभरात.

• खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी सामाजिक भान ठेवावे.

• शासकीय पातळीवर महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमधील नियमात सुधारणा.

• नाभिक समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडणार.

पोलीस शिपाई परचंडे यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

सोलापूर, दि. 11- कोविड 19 अनुषंगाने कर्तव्य बजावत असताना मृत झालेले पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्या कुटुंबियास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

कर्तव्यावर असताना श्री परचंडे यांचे 22 मे 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या परिवारास पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत विशेष सहायता निधी मंजूर झाला होता. तो निधी पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते परचंडे यांच्या पत्नी नम्रता परचंडे, आई सुमन परचंडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!