सोलापूरमध्ये चेस दि व्हायरस प्रभावीपणे राबवा, आरोग्य सुविधा वाढवा : मुख्यमंत्री

मुंबई, दि 20: सोलापूरमधील रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या थोपवा, चेस दि व्हायरसची मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर कोरोनामुक्त करा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या काळात विलगीकरण व इतर आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचे निर्देश दिले.
ते आज सोलापूर जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचीही उपस्थिती होती.
रोग आटोक्यात येतोय असा गाफिलपणा दाखवू नका, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबईमध्ये चेस दि व्हायरस मोहीम प्रभावीपणे राबविली गेली. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची घनता असूनही ही महामारी खूप पसरू दिलेली नाही. सोलापूरमध्ये विडी कामगार तसेच हातमाग, यंत्रमागातील कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना आरोग्याच्या काही समस्या येत असतात, विशेषत: फुफ्फुसे, श्वसनाशी संबंधित रोग मोठ्या प्रमाणावर आढळतो. तसेच त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांना लवकर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत पोहोचून अतिशय काटेकोर आणि जलद पाऊले उचलून घरोघरी तपासणी आणि चाचण्या वाढवाव्यात. सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. पुढील काळातही खासगी डॉक्टर्सची सेवा घेणे, विलगीकरण सुविधा वाढविणे, 60 वर्षांच्या पुढील सर्वांची ऑक्सिजन पातळी तपासणे, त्यांना इतर कुठले आजार झाले आहेत ते पाहणे या बाबींना अधिक वेग द्यावा. कंटेनमेंट झोन्सकडे अधिक लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
प्रशासनाने कोणत्याही दडपणाला बळी न पडता आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. इमारतीऐवजी मोठे सभामंडप, गोडावून ताब्यात घेऊन सुविधा निर्माण करा. सोयीसुविधासाठी लागणारी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे सर्व पुरविण्यात येईल. जिल्हाभर कोरोना दक्षता समितीने जागृतीचे काम करावे, असेही मुख्यंत्री म्हणाले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूरमध्ये 3 जूननंतर म्हणजे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अचानक रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली. गेल्या आठवड्यात एन्टीजेन चाचणीमुळे ९०० रुग्ण सापडले. सध्या रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी दर ५५ टक्के असून २७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात एकूण ३६९ मृत्यू झाले असून मृत्यूदर कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. साडेदहा लाख लोकांचे सर्व्हेक्षण झाले असून सुमारे सव्वालाख लोकांना एकापेक्षा अधिक रोग आहेत, असे आढळले आहे. २७ हजार लोक कंटेनमेंट क्षेत्रात आहेत. दिवसाला सरासरी २ हजार चाचण्या करीत असून त्या ३ हजार करण्याचे उद्दिष्ट्य आहे असेही ते म्हणाले. मनुष्यबळाची पूर्तता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, विशेषत पालिकेच्या ६, ७, ८ प्रभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात लोकांचे इतरही जिल्ह्यातून येणे जाणे असल्याने रुग्ण संख्या वाढते आहे. विडी कामगारांच्या फुफ्फुसे, डोळे, हाताना इजा होण्याचे प्रमाण खूप आहे. याठिकाणी ताडी, तंबाखू सेवनाचे प्रमाणही जास्त आहे.
पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले की, सोलापूरमध्ये १३०० खासगी डॉक्टर्स असून यापूर्वीही ३३ डॉक्टर्सनी सेवा घेतली आहे. १२ एप्रिल रोजी सोलापुरात १ रुग्ण आढळला होता. ४ ते ३ जून दरम्यान ४२ केसेस होत्या. ३ जूननंतर अचानक १५२१ केसेस झाल्या.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी देखील उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्य सचिव संजय कुमार यांनी कोरोनाशी लढताना जिल्हा प्रशासनाला ज्या काही कमतरता भासत असतील त्याची पूर्तता राज्य सरकारकडून तातडीने करण्यात येईल असे सांगितले. अजोय मेहता यांनी अतिशय काटेकोरपणे कोरोना रुग्णांचा शोध, त्यांचे जास्तीत जास्त संपर्क तपासणे, ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णांना दिली जाणारी सेवा यावर भर दिल्यास मृत्यूदर कमी होईल असे सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!