मंत्रिपद नसलेल्या सोलापूर जिल्ह्यावर आता थेट पवारांचा कंट्रोल

प्रशांत आराध्ये

सोमवारी 30 डिसेंबर रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला एक ही मंत्रिपद देण्यात न आल्याने सार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत. येथे राष्ट्रवादी , काँग्रेस व शिवसेना व समर्थक अपक्ष असे सहा आमदार असले तरी एक ही मंत्रिपद वाट्याला येवू शकलेले नाही. यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. एवढेच काय पण शिवसेनेत मातब्बर बनलेल्या आमदार तानाजी सावंत यांना ही संधी मिळालेली नाही हे विशेष म्हणावे लागणार आहे. कदाचित हा शरद पवार यांचा लाडका जिल्हा असल्याने येथील राजकारणावर कोणा मंत्र्यांकडून पकड ठेवण्याऐवजी ते थेटच आपला कंट्रोल ठेवतील असे दिसत आहे.
सोलापूर हा बारामतीच्या शेजारचा भाग आहे आणि तो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मध्यंतरी राज्यात भाजपाचे सरकार असताना येथील नव्या दमाच्या राष्ट्रवादीतील सहकार्‍यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ करत सोलापूर जिल्ह्यात कमळाला पाय रोखण्यास जागा दिली आणि यातून दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपाने जिंकल्या व यानंतर विधानसभेला भाजपाने सोलापूरमधील दोन तर अक्कलकोट व माळशिरसच्या जागेवर ताबा मिळविला आणि बार्शीत भाजपाशी निगडीत अपक्ष आमदार विजयी झाले. सोलापूर महापालिका ही कमळाकडेच आहे. परंपरागत काँग्रेसी विचारसरणीचा जिल्हा आता भाजपाच्या हाती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शरद पवार यांनी नेहमीच सोलापूरच्या राजकारणावर आपले वर्चस्व ठेवले आहे. मात्र भाजपाच्या सत्ता काळात येथील अनेकांनी राष्ट्रवादीचा त्याग केला तर काहींनी पक्षात राहून भाजपाशी संधान साधले होते. काही नेते आधी गेले आणि नंतर पुन्हा स्वगृही ही परतले तर काहींना जाता आले नाही म्हणून थांबले अशी अवस्था होती. हे सारे पवार ओळखून आहेत. यास्तव कदाचित त्यांनी सोलापूरला मंत्रिपद देण्याऐवजी आपल्याच हाती येथील नियंत्रण ठेवण्याची तयारी केली असावी असे राजकीय जाणकारांचे मत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात येथील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांची नावे येत होती मात्र आज सकाळी कोणाला ही संधी नसल्याचे दिसून आले.
सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व शरद पवार यांनी माढा लोकसभेच्या रूपाने केले आहे. मात्र याच जागेवरून 2019 च्या निवडणुकीत त्यांना विरोधकांची खूप टीका ही सहन करावी लागली व ही जागा देखील गमवावी लागली. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच राष्ट्रवादी व काँगे्रस सोडून गेलेले पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.जिल्हा परिषदेत सत्तांतर करण्याची तयारी..

अडीच वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने समविचारी आघाडी तयार करण्यात आली होती व जिल्हा परिषदेत त्यांनी सत्ता मिळविली. तेंव्हाचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे आता भाजपापासून दूर असून ते राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी समवेत आहेत. आता उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होत असून यात कोणत्या ही परिस्थितीत सर्वाधिक संख्याबळ असणार्‍या राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशी तयारी राष्ट्रवादीने केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार यांचे ही लक्ष या भागावर आहे. राज्यात आता सत्तांतर झाल्याने काही नेते उघडपणे जरी साथ देत नसले तरी ऐनवेळी राष्ट्रवादीला साथ करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. येथे काय होते यावर ही येथील राजकारणाचे पुढील भवितव्य अवलंबून आहे, काही बडे नेते पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा ही रंगत आहेत. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादीने आपले सदस्य शिर्डीला देवदर्शनासाठी पाठविले आहेत तर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे विरोधक ही जिल्हा परिषदेवर वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत पण त्यांना कितपत यश मिळेल हे लवकरच समजून येईल.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!