सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन बाबतचे यापूर्वीचेच आदेश १५ जूनपर्यंत लागू राहणार

*कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर सोलापूर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल नाहीत…*
—————–

सोलापूर दि १ – ब्रेक दि चेनचे म्हणजेच लॉकडाऊनचे आदेश महानगरपालिका व जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध तसेच ठेवण्यात आले आहेत.

२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि सोलापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली आहे.

*शासनाच्या लोकसंख्या निकषाप्रमाणे निर्बंधात सवलत देण्यासाठी सोलापूर महानगरपालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक नसल्याने जिल्ह्याचे आदेश शहरात तसेच लागू करण्यात आले आहेत.*
-जमीर लेंगरेकर, उपायुक्त, सो.म.पा.

२०११ च्या जणगणनेनुसार १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात आले आहे. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक असल्याने सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्ह्यासाठी एकच निर्णय लागू करण्यात आला आहे.

*पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने इतर जिल्हे किंवा पालिकांप्रमाणे सध्यातरी निर्बंध सवलत मिळणार नाही.*

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) निर्बंध शिथिल आहेत. मात्र सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात निर्बंध तसेच असतील .

*सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती तशीच सुरू राहतील.*

*सर्व अत्यावश्यक गटात नसलेली (Non essential shops) बंद राहतील.*

सकाळी ११ नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध तसेच असतील.

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही १५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहतील. .

थोडक्यात महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आधी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

——————————————

*१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी*

Ø कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

Ø यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

Ø मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

Ø स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

Ø दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!