पंढरपूर पोटनिवडणूक : फेरमतमोजणीची मागणी, अन्यथा आंदोलन व न्यायालयात जाण्याचा उमेदवारांचा इशारा


पंढरपूर– नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर विविध पक्ष व संघटनांच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला असून ही प्रक्रिया पारदर्शी पध्दतीने पार पडली नसल्याचा गंभीर आरोप करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यास निवडणूक निर्णय अधिकारी दाद देत नसल्याने आंदोलन केली जाणार आहेत तर  न्यायालयात ही दाद मागितली जाणार असल्याचे या उमेदवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, अपक्ष उमेदवार सिध्देश्‍वर आवताडे यांचे प्रतिनिधी यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत बोलताना सचिन पाटील म्हणाले, आपण गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्‍यांसाठी आंदोलन करीत असून हजारो शेतकर्‍यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. तसेच निवडणुकीसाठी 32 लाख 68 हजार रूपये वर्गणी गोळा करून दिली होती. अशा स्थितीत मला 1 हजार 27 मत मिळणे शक्यच नाही.  माझ्यासाठी शेतकरी संघटना, आपले पै पाहुणे असे एक हजारहून अधिकजण प्रचारात सहभागी झाले असताना त्यापेक्षा कमी मते कशी मिळतील असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मतमोजणीनंतर अनेकांनी मला प्रतिज्ञापत्रावर मतदान केल्याचे लिहून देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ज्या पदाधिकार्‍याच्या घरात पंधरा मते आहेत, त्या केंद्रावर पाचच मते मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सदर सर्व यंत्रणा सदोष असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचे प्रतिनिधी संदीप मांडवे यांनी, मतदानानंतर गोदामाची पाहणी करत असताना आमच्या कार्यकर्त्यांना जॅमर सदृष्य एक यंत्र आढळून आले असल्याचे सांगितले. याबाबत तक्रार केली असता अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हे यंत्र मतदानयंत्रामधील बॅटरी असल्याचे सांगितले. मात्र हे बाहेर कसे आले याबाबत सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यास नकार दिला. याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांना वारंवार माहिती विचारली असता त्यांनी उलट आम्हालाच गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली असल्याचा दावा मांडवे यांनी केला.
श्रीकांत शिंदे यांनी मतदानानंतर स्वेरी संस्थेचे सॉफ्टवेअर घेण्यावरून प्रश्‍न उपस्थित केला आहे. स्वेरी संस्थेचे संस्थापक सचिव हे भाजपाचे अधिकृत पदाधिकारी असून त्यांच्या महाविद्यालयात भाजपा व आरएसएसचे अनेक कार्यक्रम होतात. अशावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीसाठी त्यांच्या सॉफ्टवेअरची मदत का घेतली. याबाबत त्यांनी निविदा का प्रसिध्द केली नाही,असा प्रश्‍न उपस्थित केला.
शैला गोडसे म्हणाल्या, निवडणुकीत हार जीत होत असते. परंतु आम्हाला मिळणारा जनतेचा प्रतिसाद, कार्यकर्त्यांची फळी पाहता ऐवढी कमी मते मिळणे शक्यच नसल्याचा दावा केला. यामध्ये काही तरी शंकास्पद घटना घडल्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!